बेंगळूर/प्रतिनिधी
राज्यात एसएसएलसी, पीयूसी बोर्ड परीक्षा २०२१ आयोजित करण्याचा अंतिम निर्णय आज जाहीर करण्यात आला आहे. कर्नाटकचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षणमंत्री एस. सुरेश कुमार यांनी बारावीची परीक्षा रद्द, तर दहावीची परीक्षा होणार असल्याचे सांगितले. शुक्रवारी सकाळी १० वाजता मंत्री शिक्षणमंत्री एस. सुरेश कुमार यांनी बैठक घेऊन अंतिम निर्णय जाहीर केला.
केंद्र सरकारने मंगळवारी देशभरातील सीबीएसई १२ वी च्या बोर्ड परीक्षा कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर रद्द करण्याचा निर्णय घेतला होता आणि केंद्राच्या निर्णयानंतर अनेक राज्यांनीही बोर्ड परीक्षा रद्द केल्या आहेत. आता कर्नाटकानेही पीयूसी परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.
दरम्यान कर्नाटक सरकारनेही परीक्षा रद्द कराव्यात यासाठी पालक आणि विद्यार्थ्यांकडून दबाव टाकला जात होता. विद्यार्थी आणि पालकांनी सरकारने कोरोना परिस्थिती लक्षात घेऊन परीक्षा रद्द कराव्यात अशी मागणी केली होती.