जलअभ्यासकांवर जबाबदारी वाढली, एक जूनपासून सर्वच केंद्रावरुन महापूराचे निरीक्षण
प्रतिनिधी / मिरज
सन 2005 व 2019 च्या कृष्णा नदीच्या महापूरातील सर्व बाबीचा विचार करून यावर्षी महापुराचे निरीक्षण करण्यासाठी केंद्रीय जल आयोगाच्या अर्जुनवाड व कुरुंदवाड केंद्राना अति महत्वाची केंद्रे म्हणून दर्जा मिळाला आहे. दरम्यान, अर्जूनवाड आणि कुरुंदवाड या दोन्ही केंद्रांना अतिमहत्त्व देण्यात आल्याने या केंद्रांतर्गत महापूराचे निरीक्षण करणाऱ्या जल अभ्यासकांच्या जबाबदारीतही वाढ झाली आहे.
सध्या जल आयोगाची सर्वच केंद्रे सक्रिय झाली असून, एक जून पासून रात्र-दिवस प्रत्येक तासाला पाण्याची पातळी तपासली जात आहे. व वरिष्ट अधिकारी यांना कळवण्यात येत आहे. अद्याप पाणी वाहते न झाल्याने बऱ्याच केंद्रावर विसर्ग मोजण्यास सुरवात झाली नाही. कृष्णा व त्या नदीस जोडणाऱ्या सर्व उपनद्यांवर पाण्याचा प्रवाह वाहता झाल्यास तात्काळ पाण्याचा विसर्ग मोजण्यास सुरुवात होणार आहे. कुरुंदवाड केंद्राची जबाबदारी कनिष्ठ अभियंता रुपेश कुमार यादव तर अर्जुनवाड केंद्राची जबाबदारी कुशल कार्य सहाय्यक उद्धव मगदूम यांच्याकडे आहे.








