फुटबॉल विश्वचषक व आशियाई चषक पात्रता फेरीची संयुक्त लढत
दोहा / वृत्तसंस्था
फुटबॉल विश्वचषक व आशियाई चषक पात्रतेच्या संयुक्त लढतीत आज (गुरुवार दि. 3) भारतासमोर यजमान कतारचे कडवे आव्हान असणार आहे. कतारच्या राजधानीतच ही लढत होत आहे.
यापूर्वी, सप्टेंबर 2019 मध्ये भारताने कडवी लढत देत कतारला गोलशून्य बरोबरीत रोखण्याचा पराक्रम गाजवला होता. मात्र, घरच्या मैदानावर खेळत असताना आज कतारची बाजू वरचढ ठरु शकते. पूर्वनियोजित रुपरेषेप्रमाणे, पात्रता फेरीचे सामने गतवर्षी खेळवले जाणार होते. मात्र, कोरोनाच्या संकटामुळे ते लांबणीवर टाकली गेले. यंदा ई गटातील सर्व सामने कतारच्या राजधानीत खेळवण्याचा निर्णय घेतला गेला आहे.
कतारविरुद्ध पहिल्या फेरीतील लढतीनंतर भारतीय संघाच्या कामगिरीत घसरण झाली. मागील लढतीत भारताला संयुक्त अरब अमिरातविरुद्ध 0-6 अशा फरकाने पराभवाला सामोरे जावे लागले. दुसरीकडे, कतारने मात्र लक्झमबर्गला 1-0 व अझरबैजानला 2-1 अशा फरकाने नमवले असून आयर्लंडविरुद्ध मार्चमध्ये झालेल्या आंतरराष्ट्रीय मैत्रीपूर्ण लढतीत 1-1 अशी बरोबरी नोंदवली आहे.
भारताला मागील लढतीत संयुक्त अरब अमिरातविरुद्ध पराभव पत्करावा लागला. शिवाय, प्रशिक्षण शिबिर रद्द करावे लागल्याने संघाला सराव देखील करता आलेला नाही. संघाचे हे सराव शिबिर कोलकात्यात होणार होते. संघातील सर्व खेळाडू दि. 19 मे रोजी येथे पोहोचले. मात्र, ज्या सुविधा आवश्यक आहेत, त्याची पूर्तता होऊ शकत नसल्याचे त्यांना तेथे पोहोचल्यानंतर कळाले.
कतारविरुद्ध 2019 मधील लढतीत सुनील छेत्री तापाने फणफणलेला असल्याने खेळू शकला नव्हता. येथे छेत्री खेळणार असल्याने संघातील युवा खेळाडूंचे मनोबल उंचावले जाऊ शकते. छेत्रीला यापूर्वी मार्चमध्ये 2 आंतरराष्ट्रीय मैत्रिपूर्ण लढतीत देखील खेळता आले नव्हते. यात संयुक्त अरब अमिरातविरुद्ध शेवटच्या लढतीत तो नुकताच कोरोनातून सावरलेला असल्याने खेळू शकला नव्हता. फिफाच्या मानांकन यादीत कतार 58 व्या तर भारत 105 व्या स्थानी आहे.
कोटस
कतार आशियातील सर्वोत्तम संघापैकी एक आहे. अगदी अलीकडे त्यांनी युरोपियन व दक्षिण अमेरिकन संघाविरुद्ध लक्षवेधी कामगिरी साकारली आहे. कतारविरुद्ध मागील लढतीत आम्ही बरोबरीचा एक गुण मिळवला होता. त्यामुळे, या लढतीत ते आक्रमणावर भर देण्याची शक्यता आहे. साहजिकच, आम्हाला सांघिक खेळावर भर द्यावा लागेल.
-भारतीय कर्णधार सुनील छेत्री









