अभिनेत्री विद्या बालन हिच्या ‘शेरनी’ चित्रपटाचा ट्रेलर बुधवारी प्रदर्शित झाला आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन अमित मसूरकर यांनी केले आहे. हा चित्रपट 18 जून रोजी ओटीटी प्लॅटफॉर्म अमेझॉन प्राइमवर स्ट्रीम करण्यात येणार आहे. विद्या बालनसह शरत सक्सेना, मुकुल चड्ढा, विजय राज, इला अरुण, बृजेंद्र कला आणि नीरज काबी यासारखे कलाकार या चित्रपटात आहेत.

शेरनीच्या ट्रेलरला मोठी पसंती मिळत आहे. विद्या बालनचा बहारदार अभिनय यात पहायला मिळणार आहे. चित्रपटात विद्या एका वन अधिकाऱयाच्या भूमिकेत आहे. जंगलातील एक वाघ नरभक्षक ठरल्याचे ट्रेलरमध्ये दाखविण्यात आले आहे. शेरनी हा चित्रपट माणूस आणि प्राण्यांमधील संघर्षाच्या जटिल मुद्दय़ांचा शोध घेणारा असल्याचे उद्गार दिग्दर्शक अमित मसूरकर यांनी काढले आहेत. चित्रपट एका संवेदनशील विषयाशी संबंधित आहे. सह-अस्तित्वाचा संदेश यातून मिळणार असल्याचे विद्या बालन हिने म्हटले आहे. 2 मिनिटे 46 सेकंदांच्या ट्रेलरमध्ये विद्या बालनच्या व्यक्तिरेखेचा प्रवास दाखविण्यात आला आहे.









