मृतांमध्ये 4 मुलांचा समावेश ः 6 गंभीर जखमी
वृत्तसंस्था/ गोंडा
उत्तरप्रदेशच्या गोंडा जिल्हय़ात मंगळवारी रात्री उशिरा मोठी दुर्घटना घडली आहे. येथील टिकरी गावात सिलिंडरमध्ये झालेल्या स्फोटामुळे दोन घरे जमीनदोस्त झाली आहेत. या घरांच्या ढिगाऱयाखाली 14 जण चिरडले गेले. या लोकांना पोलिसांनी ग्रामस्थांच्या मदतीने बाहेर काढले आहे. पण तोपर्यंत 7 जणांचा मृत्यू झाला होता. तर एका व्यक्तीने रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला होता. 8 मृतांमध्ये 2 पुरुष आणि दोन महिला तसेच 4 मुलांचा समावेश आहे. 6 गंभीर जखमींना लखनौतील रुग्णालयात हलविण्यात आले आहे.
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दुर्घटनेवर दुःख व्यक्त केले आहे. त्यांनी अधिकाऱयांना त्वरित घटनास्थळी पोहोचून मदत तसेच बचावाचे कार्य करण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच दुर्घटनेच्या उच्चस्तरीय चौकशीचेही आदेश दिले आहेत.
टिकरी गावातील नुरुल हसन यांच्याकडे फटाके निर्मितीचा परवाना होता. मंगळवारी रात्री सुमारे 11 वाजण्याच्या सुमारास त्यांच्या घरात विस्फोट झाला, या त हसन यांच्यासह लागून असलेले शेजाऱयाचे घरही जमीनदोस्त झाले आहे. ग्रामस्थांनी कळविल्यावर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत यंत्रांच्या मदतीने ढिगारा हटविला आहे.
पोलीस महानिरीक्षक राकेश सिंग, पोलीस अधीक्षक संतोष कुमार मिश्र घटनास्थळी पोहोचले आहेत. विस्फोटाच्या कारणांचा शोध घेण्यासाठी फोरेन्सिक पथकाला पाचारण करण्यात आले आहे. सिलिंडर विस्फोटामुळे छत कोसळल्याचा प्रथमिक अंदाज आहे. चौकशीत समोर येणाऱया माहितीनुसार पुढील कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती पोलीस अधीक्षकांनी दिली आहे.









