ऑनलाईन टीम / इस्लामाबाद :
कोरोना लसींसाठी आजवर चीन आणि रशियावर अवलंबून असलेल्या पाकिस्ताने आता स्वदेशी कोरोना लस तयार केली आहे. ‘पाकवॅक’ असे या लसीला नाव देण्यात आले आहे. पाकचे पंतप्रधान इम्रान खान यांचे स्वास्थ्य सल्लागार डॉ. फैसल सुलतान यांनी ही लस लाँच केली.
यावेळी बोलताना डॉ. फैसल म्हणाले, कोरोना महामारीचा सामना करण्यासाठी देशात लसीकरणाला वेग देणे गरजेचे होते. आतापर्यंत आम्ही लसीसाठी चीन आणि रशियावर अवलंबून होतो. मात्र, अनेक अडचणींचा सामना करत राष्ट्रीय आरोग्य संस्थेच्या संशोधकांची कोरोना लस तयार केली. या कठीण काळात चीन आमच्या सोबत होता.
चीनमधील कॅनसिनो बायोच्या मदतीने पाकिस्तानमध्ये ही लस उत्पादित करण्यात आली आहे. या लसीच्या चाचण्या घेण्यात आल्या असून, येत्या काही दिवसातच पाकिस्तानात लसीचे मोठ्या प्रमाणात उत्पादन सुरू होईल, असेही सुलतान म्हणाले.