अचूक बातमी “तरुण भारत”ची, बुधवार, 2 जून 2021, सकाळी 10.15
● 24 तासात 1522 रूग्णांची वाढ ● एकूण रूग्णवाढ 1 लाख 67 हजारावर ● पॉझिटिव्हिटी रेट कमी होतोय ● सातारासह तीन तालुक्यात वाढ कमी होणे आवश्यक ● कोरोनामुक्तांची संख्याही वाढतेय
सातारा / प्रतिनिधी :
जिल्ह्यातील कोरोना रूग्णवाढीचा मे महिन्यात रेकॉर्डब्रेक वेग वाढला होता. एका बाजूला रूग्णवाढीचे आकडे कमी होत नसताना दुसरीकडे ‘तरूण भारत’ने रूग्णांच्या आकड्यांचा घोटाळा समोर आणल्याने जिल्हावासियांच्यातील संभ्रम प्रचंड वाढला आहे. रूग्णवाढीतून सावरण्यासाठी प्रयत्न होत असतानाच दुसरीकडे 31 मे आणि 1 जून या दिवशी कराडसह जिल्ह्याच्या काही भागात मुसळधार पावसाने नागरिकांची प्रचंड धावपळ उडवली. वातावरणातही अचानक बदल झाल्याने लहान मुलांमधे सर्दी, खोकल्याच्या आजाराचे प्रमाण वाढण्याची भिती निर्माण झाली. दरम्यान बुधवारी सकाळी जिल्ह्यात 1522 रूग्णवाढ झाली असून, एकूण रूग्णवाढीचा आकडा 1,67,778 वर पोहचला आहे.
संंस्थात्मक विलिगीकरणाला नकार
जिल्ह्यात गत महिन्यात रूग्णवाढीचा विक्रम केल्याने सातारा जिल्हा ‘रेड झोन’ मधे गेला. परिणामी जिल्ह्यातील कडक लॉकडाऊन पुन्हा आठ दिवस वाढला. रूग्णवाढ कमी करण्यासाठी गृहविलिगीकरणापेक्षा संस्थात्मक विलिगीकरणावर भर द्यावा असे आदेश असले तरी अपवाद वगळता रूग्णांची किंवा त्यांच्या नातेवाईकांची संस्थात्मक विलिगीकरण व्हायची मानसिकता दिसत नाही. बरेच रूग्ण हे गृहविलिगीकरणात राहण्याचा आग्रह धरत असल्याने स्थानिक प्रशासनाची अडचण वाढत आहे. संस्थात्मक विलिगीकरणाच्या सोयीसुविधांवर रूग्णांचे नातेवाईक प्रश्नचिन्ह उभा करताना अनेकदा वादही होत आहेत. यावर समन्वयाने मार्ग काढण्याची गरज असल्याची प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.
सातारा, फलटण, कराड सावरणे गरजेचे
जिल्ह्यात एप्रिल आणि मे महिन्यात कोरोनाने हाहाकार माजवला. यामधे सातारा, फलटण, कराड, खटाव या तालुक्यांना रूग्णवाढीची झळ जास्त प्रमाणात बसली. ती अजुनही बसतच आहे. मंगळवारच्या आकडेवारीचा विचार करता फलटण तालुक्यात 339 रूग्ण वाढले असून आत्तापर्यंतची एकूण रूग्णसंख्या 26,360 झाली आहे. सातारा तालुक्यात 345 रूग्ण वाढले असून एकूण रूग्णसंख्येने 35 हजारांचा टप्पा ओलांडत हा आकडा 35,466 वर पोहचला आहे. कराड तालुक्यात 206 रूग्ण वाढले असून एकूण रूग्ण संख्या 22,399 वर पोहचली आहे. तर खटाव तालुक्यात नवे 189 रूग्ण वाढल्याने एकूण रूग्णसंख्या 15,977 वर पोहचली आहे. हे तालुके आजही रूग्णवाढीत टॉपवर आहेत. त्यामुळे या तालुक्यातील संस्थात्मक विलिगीकरण, गृहविलगीकरण, रूग्णालयांमधील स्थितीचा प्रशासनाने सातत्याने आढावा घेत रूग्णवाढ कमी करण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजनांची कागदोपत्री नव्हे तर प्रत्यक्ष अमलबजावणी करणे गरजेचे असल्याची प्रतिक्रिया आहे.
किराणा साहित्यासाठी फरपट
जिल्ह्यात कडक लॉकडाऊन वाढला असून हजारो कुटूंबे हातावरचे पोट असणारी आहेत. सध्या किराणा साहित्याची दुकाने बंद असल्याने अशा कुटूंबांची साहित्यासाठी फरपट होताना दिसत आहे. घरपोच सुविधेबाबतही प्रश्नचिन्ह असल्याने बाहेर पडता येत नाही आणि घरी कोणी आणून देत नाही अशी अवस्था कितीतरी कुटूंबांची झाली आहे. रूग्णवाढ रोखण्याला पहिले प्राधान्य दिलेच पाहिजे. मात्र ते देत असताना मध्यमवर्गीयांसमोरील प्रश्न सोडवण्यासाठी काटेकोर नियम घालून काही सुविधा व्हायला हव्यात अशी मागणी आहे.
मंगळवारपर्यंत जिल्हय़ात एकूण नमुने 7,88,834, एकूण बाधित – 1,67778, एकूण कोरोनामुक्त 1,41,170, मृत्यू -3,677, उपचारार्थ रुग्ण-22934
मंगळवारी जिल्ह्यात बाधित 1522, मुक्त 2,369, बळी 35









