ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
दिल्लीत आता पुन्हा एकदा 18 ते 45 वयोगटातील नागरिकांसाठी हळूहळू लसीकरण सुरु केले जात आहे. तसेच दिल्लीकरांना 20 जूननंतर ‘स्पुटनिक व्ही’ लस देखील मिळणार आहे, अशी माहिती दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी सोमवारी दिली.

सोमवारी आयटीओ येथील एका सरकारी शाळेमध्ये पत्रकार आणि पत्रकारांच्या कुटुंबीयांसाठी निःशुल्क लसीकरण सेंटर सुरू करण्यात आले आहे. या सेंटरचे उद्घाटन मुख्यमंत्री केजरीवाल यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी त्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला.

पुढे ते म्हणाले, आता ‘स्पुटनिक व्ही’ लस आयात करूनच दिल्लीवासियांना दिली जाणार आहे. तसेच भारतात या लसीचे उत्पादन ऑगस्ट महिन्यात सुरू होण्याची शक्यता आहे.
दरम्यान, नुकतेच केजरीवाल यांनी पत्रकारांसाठी निःशुल्क लसीकरण केंद्र सुरू करणार असल्याची घोषणा केली होती आणि त्यानंतर केजरीवाल यांच्या हस्ते या सेंटरचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी केजरीवाल म्हणाले की, आम्ही 45 वयापेक्षा अधिक आणि 18 ते 44 या वयोगटातील पत्रकार आणि त्यांच्या कुटुंबियांच्या लसीकरणासाठी ही सुविधा सुरू करण्यात आली आहे.
- राजधानीत ब्लॅक फंगसच्या लसींची कमतरता : केजरीवाल
ब्लॅक फंगसबाबत बोलताना मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल म्हणाले की, राजधानीत या औषधांचा देखील तुटवडा जाणवत आहे. कालच्या दिवशी 1 हजारच्या आसपास लसी उपलब्ध झालेल्या मात्र, ह्या फारच कमी आहेत. कारण राज्यात 1 दिवशी एका रुग्णाला तीन ते चार लसींची गरज भासत आहे.









