बेंगळूर/प्रतिनिधी
कर्नाटकचे गृहराज्यमंत्री बसवराज बोम्माई यांनी शनिवारी संकेत दिले की कोविड -१९ च्या नियंत्रणासाठी कडक उपाययोजना संपूर्ण जूनमध्ये कायम राहतील. ग्रामीण भागांमध्ये कोरोनाचे मोठ्या प्रमाणात रुग्ण सापडत असल्याने चिंता निर्माण झाली आहे, असेही ते म्हणाले. त्यामुळे कोरोनावर नियंत्रण ठेवायचे झाल्यास राज्यात कोरोना नियमांची कडक अंमलबजावणी करणे आवश्यक आहे.
“केंद्रीय गृह मंत्रालयाने राज्यांना पुरेसे मार्गदर्शन केले आहे आणि ३० जून पर्यंत कठोर उपाययोजना कराव्यात असे ते म्हंटले आहे. दरम्यान याची अंमलबजावणी कशी करावी आणि कशास परवानगी द्यायला हवी याचा निर्णय मुख्यमंत्र्यांसमवेत घेतील,” असे बोम्माई यांनी पत्रकारांना सांगितले.
कर्नाटकातील लॉकडाउन ७ जून रोजी संपणार आहे. राज्यात कठोर उपाययोजना सुरु आहेत. परंतु सकारात्मकता दर कमी झाला नसल्याचे बोम्माई यांनी निदर्शनास आणून दिले. “सकारात्मकता दर सध्याच्या १ १६-१७ टक्क्यांपेक्षा दहा टक्क्यांच्या खाली आला पाहिजे. ग्रामीण भागात अद्याप प्रकरणे २२ हजार ते २३ हजार आहेत. ते प्रमाण १० हजाराच्या खाली आले पाहिजे. मृत्यू दर देखील कमी केला पाहिजे. तेव्हाच आमची आरोग्य पायाभूत सुविधा टिकून राहण्यास सक्षम होईल, ” असे ते म्हणाले.
शुक्रवारी कर्नाटकात कोविड -१९ ची २२,८२३ नवीन प्रकरणे आढळली आहेत. राज्यात एकूण ३.७२ लाख सक्रिय प्रकरणे असून बेंगळूरमध्ये १.८० लाख प्रकरणे आहेत.