प्रतिनिधी / नागठाणे :
वडगाव (ता.माण) येथील जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक संजय लक्ष्मण खरात यांनी कोरोना कालावधीत घरोघरी शाळा निर्माण करून शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल भक्ती रिसर्च सेंटर, साताराचे डॉ.अशोकराव पाटील यांनी त्यांचा सन्मान केला.
कोरोना संकटामुळे सर्वत्र शाळा बंद असल्यामुळे सर्वत्र ऑनलाईन शिक्षण सुरू झाले होते. विद्यार्थ्याना प्रभावीपणे शिक्षण देण्यासाठी खरात यांनी प्रत्येक विद्यार्थ्याच्या घरातच स्वतंत्र शाळा तयार करून विद्यार्थ्यांचे शिक्षण अखंडीतपणे सुरू ठेवले. यासाठी प्रत्येक विद्यार्थ्यास स्वत: तयार केलेला स्वतंत्र शैक्षणिक साहित्याचा संच मोफत दिला. कोरोना व लॉकडाऊनमुळे अगोदरच अडचणीत सापडलेल्या पालकांना अधिक आर्थिक ताण येवु नये म्हणून घरोघरी शाळा तयार करण्यासाठी लागणारा सर्व खर्च खरात यांनी केला.
जुलै २०२० पासून एप्रिल अखेर एकूण ३५०० वेळा गृहभेटी देऊन त्यांनी विद्यार्थ्यांचे शिक्षण अखंडीतपणे सुरू ठेवले आहे. त्यांच्या या कार्याची दखल घेवून भक्ती रिसर्च सेंटर साताराचे डॉ.अशोकराव पाटील यांनी संजय खरात यांचा सन्मानपत्र व उज्वला सहाणे लिखित ‘प्रेरणा’ हे पुस्तक भेट देवून विशेष सन्मान केला. खरात यांचे जिल्हयातील विविध स्तरातून अभिनंदन होत आहे.









