अत्यावश्यक सेवा वगळता सर्व व्यवहार बंद
प्रतिनिधी / बेळगाव
गेल्या आठवडय़ाप्रमाणेच शनिवार दि. 29 मे सकाळपासून सोमवार दि. 31 मे च्या सकाळी 6 पर्यंत विकेंड लॉकडाऊन असणार आहे. या काळात दूध, औषधे, दवाखाने, वृत्तपत्र सेवा वगळता इतर सर्व व्यवहार बंद असणार आहेत. नागरिकांनी अनावश्यकपणे घराबाहेर पडू नये, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
शनिवार व रविवारी विकेंड लॉकडाऊन असल्यामुळे शुक्रवारी सकाळी खरेदीसाठी मुख्य बाजारपेठ व उपनगरांमध्ये गर्दी होती. लॉकडाऊनच्या काळात दूध, औषधे, दवाखाने सुरू असणार आहेत. मालवाहतूकही सुरू असणार आहे. या व्यतिरिक्त इतर सर्व व्यवहार बंद असणार आहेत. इतर वेळेला रोज सकाळी 6 ते 10 यावेळेत चार तास अत्यावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी मुभा दिली जायची. शनिवारी आणि रविवारी ही मुभा असणार नाही. कोरोना महामारी थोपविण्यासाठीची उपाय योजना म्हणून विकेंड लॉकडाऊन जारी करण्यात आला आहे. या काळात तपासणी आणखी तीव्र करण्यात येणार असून अनावश्यकपणे फिरणाऱयांवर कडक कारवाई करण्याचा इशारा पोलीस उपायुक्त डॉ. विक्रम आमटे यांनी दिला आहे.









