गोकाक येथे आमदार रमेश जारकीहोळी यांचा अधिकाऱयांना इशारा : तालुकास्तरीय अधिकाऱयांची बैठक
वार्ताहर / घटप्रभा
कोरोना नियंत्रणासाठी तालुका पातळीवरील अधिकाऱयांपासून ग्रा. पं. पीडीओपर्यंत सर्व अधिकाऱयांनी खबरदारीने कार्य करावे. कामकाजात कोणताही हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नाही. अन्यथा कडक कारवाई केली जाईल, असा इशारा आमदार रमेश जारकीहोळी यांनी दिला. ते गोकाक येथे तालुकास्तरीय अधिकाऱयांच्या बैठकीत बोलत होते.
गोकाक तालुक्यातील ग्रामीण भागात कोरोनाचा संसर्ग गंभीर स्वरुप घेत आहे. कोरोना नियंत्रणासाठी ग्रा. पं. व्याप्तीतील शाळा, वसतिगृह याठिकाणी कोविड केअर केंद्रांची सुविधा देण्यासाठी अधिकाऱयांनी प्रयत्न करावे. स्वच्छता मोहीम राबविताना नियमावलीचे पालन करावे. आशा, अंगणवाडी कार्यकर्त्यांचे कार्य कौतुकास्पद आहे. त्या घरोघरी भेट देऊन कोरोनाबाधितांची आकडेवारी पुरवत आहेत. याची दखल घेत तालुकास्तरीय अधिकाऱयांपासून ग्रा. पं. पीडीओंपर्यंत सर्वांनी एकजुटीने कोरोनाविरुद्ध लढा द्यावा, असे आवाहनही त्यांनी केले.
तहसीलदार प्रकाश होळेप्पागोळ म्हणाले, तालुका प्रशासन व आरोग्य विभाग गावपातळीवर कोरोना नियंत्रणासाठी खबरदारी घेत आहे. कोविड सेंटर सुरू करून त्याठिकाणी बाधितांवर उपचार करण्यात येत आहेत. ग्रामस्थांनीही नियमांचे पालन करावे. विवाह व अंत्यविधीमध्ये गर्दी करू नये. प्रशासनाला सहकार्य करून कोरोनाला दूर ठेवण्यासाठी नागरिकांनी मदत करावी, असे आवाहनही त्यांनी केले. यावेळी डीवायएसपी मनोजकुमार नाईक, तालुका आरोग्य अधिकारी मुतेप्पा कोप्पद, भिमप्पा लाळी यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.









