खानापूर सरकारी दवाखान्यातील बेड्सची संख्या वाढली : 30 ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटरच्या लोकार्पणप्रसंगी आमदार निंबाळकरांचे आश्वासन
प्रतिनिधी / खानापूर
खानापूर तालुक्यात यावर्षी कोरोनाचा संसर्ग मोठय़ा प्रमाणात वाढला आहे. तो रोखण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करू. यासाठीच तालुका हॉस्पिटलला डॉ. अंजली फौंडेशन, सेल्को फौंडेशन तसेच राज्य शासनाकडून प्रत्येकी 10 ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर देण्यात आले आहेत. यामुळे कोरोना रुग्णावर उपचार करण्यासाठी तालुका हॉस्पिटलमध्ये आणखी 30 बेड्स वाढवणार आहेत. यामुळे कोरोनाबाधितांना दिलासा मिळणार आहे असे उद्गार आमदार डॉ. अंजली निंबाळकर यांनी खानापूर येथील सरकारी दवाखान्यात 30 ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटरचे लोकार्पण करताना काढले.
यावेळी त्या पुढे म्हणाल्या, यापूर्वी कोरोनाबाधितांना सरकारी विलगीकरण केंद्रात दाखल केले जात होते. पण यावर्षी शासनाने होम क्वारंटाईनवर भर दिल्यामुळेच कोरोनासंसर्गात झपाटय़ाने वाढ झाली. आता याची कल्पना राज्य शासनाला आल्यामुळे यापुढे कोरोनाबाधितांना सरकारी विलगीकरण केंद्रातच उपचार घ्यावे लागणार आहेत. तसेच कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी आम जनतेनेही सर्व नियमांचे पालन करावे असे आवाहनही यावेळी त्यांनी केले.
प्रारंभी तालुका आरोग्याधिकारी डॉ. संजय नांदे यांनी स्वागत करुन तालुक्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेतला. तसेच तालुका हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजनची कमतरता भासत होती. पण आता आमदार डॉ. अंजली निंबाळकर यांनी आपल्या फौंडेशनच्या माध्यमातून तसेच शासन दरबारी प्रयत्न करुन 30 ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटरची व्यवस्था केल्याने आता ऑक्सिजनची कमतरता थोडय़ाफार प्रमाणात दूर होणार आहे. कार्यक्रमाला डॉ. अंजली फौंडेशनचे कार्यकर्ते, सेल्को फौंडेशनचे अधिकारी तसेच डॉक्टर्स, नर्स व नागरिक उपस्थित
होते.
एका रुग्णवाहिकेचा उपयोग शववाहिकेसाठी करणार
खानापूर तालुक्यासाठी आमदार फंडातून आणखी तीन रुग्णवाहिका मंजूर करण्यात आल्या आहेत. त्यापैकी दोन रुग्णवाहिका सेवेसाठी दिल्या जातील तसेच तालुक्यात सध्या शववाहिका नसल्याने मृत व्यक्तींना दवाखान्यातून घरी घेऊन जाण्यासाठी किंवा अंत्यविधीसाठी नेण्यासाठी मोठी अडचण होत आहे. ही अडचण दूर होण्यासाठी तीनपैकी एक रुग्णवाहिकेचा उपयोग शववाहिका म्हणून करण्यात येणार असल्याची माहिती डॉ. अंजली निंबाळकर यांनी यावेळी दिली.









