योग्य काम न केल्यास आंदोलनाचा इशारा
प्रतिनिधी / मांगेवाडी
काळम्मावाडीतून थेट कोल्हापुर पाईपलाईनचे काम अनेक महिने सुरू आहे. या कामांतर्गत मांगेवाडी येथे पाईप घालण्यासाठी चर मारण्यात आली होती. चर मुजवण्यासाठी करण्यात आलेला भराव खचू लागला आहे तर कांही ठिकाणी भेग देखील पडली आहे. पावसाळ्यात चरीचा भराव अधिकच खचणार असून अपघाताचे प्रमाण वाढणार आहे. ठेकेदारांनी याची दखल घेऊन चरीचा भरावा वाहतूक योग्य करावा अन्यथा या रस्त्यावर रास्ता रोको केला जाईल असा इशारा नरतवडे चे माजी सरपंच आर. व्ही . मेस्त्री यांनी दिला आहे.
निवेदनात म्हटले आहे, काळम्मावाडी धरणातून कोल्हापूरसाठी थेट पाईपलाईनद्वारे पाणी नेण्यात येणार आहे. याचे काम अनेक महिने नरतवडे परिसरात सुरू आहे. मांगेवाडी -आकनूर रस्त्या शेजारुन ही पाईप नेण्यात आली आहे.पाईप घालण्यासाठी रस्त्याच्या कडेला मोठी चर मारली असून ती मुजवताना योग्य पद्धतीने भरावा टाकलेला नाही. त्यामुळे अवकाळी पावसाने हा भराव खचला असून भेग पडली आहे जागोजागी मोठमोठे खड्डे तयार झाले आहेत. पावसाळ्यात चरीचा भराव आणखीन खचणार असून त्यात पाणी साठून राहणार आहे.
शिवाय हा रस्त्याचा साईड भाग असल्याने यावरून वाहतूक करणे अवघड होणार आहे. मुख्य रस्ता अरुंद असल्याने वाहनधारकांना या या साईड पट्टीवरुन वाहन चालवावे लागणार आहेत. मात्र खचलेल्या भरावामुळे अपघाताची अधिक शक्यता आहे. संबंधितांना लेखी कळवून देखील त्याची दखल घेतलेली नाही .पावसाळ्यापूर्वी खचलेल्या साईडपट्टी चे काम व्यवस्थित करावे अन्यथा या रस्त्यावर रास्ता रोको केला जाईल असा इशारा देण्यात आला आहे.
रस्त्याचे नुतणीकरण आवश्यक
या पाईपलाईनचे काम करण्यासाठी मारण्यात आलेल्या चरीची माती मांगेवाडी- आकनुर या रस्त्यावर टाकण्यात आली होती त्यामुळे नवीनच केलेला डांबरीकरण रस्ता मातीमुळे खराब झाला होता. हा रस्ता तालुक्यातील वाहतुकीचा प्रमुख मार्ग असल्याने वाहनधारकांनतून नाराजी व्यक्त होत होती. या रस्त्याचे नवीन डांबरीकरण करावे अशी मागणीही नागरिक व वाहनचालक करीत आहेत. पावसाळा तोंडावर आला तरी या रस्त्याची देखील काम झालेले नाही, शिवाय साईड पट्टीचा भराव खचल्यामुळे नाराजी व्यक्त होत आहे.