ऍलोपॅथी हे मूर्खांचे शास्त्र आहे असा व्हाट्सअपवर आलेला संदेश वाचून योगगुरु बाबा रामदेव यांनी नवा वाद सुरू केला. जो गेले पाच-सहा दिवस बराच गाजत आहे. देशभरातील ऍलोपथी डॉक्टरांची संघटना असणाऱया इंडियन मेडिकल असोसिएशनने (आयएमए) या प्रकरणी रामदेव बाबांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. त्यानंतर कारवाईऐवजी समन्वय साधण्याचा प्रयत्न केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी करून पाहिला. रामदेव बाबांना हर्षवर्धन यांनी पत्र लिहून, तुम्ही कोरोना योद्धय़ांचा अनादर केलेला आहे. ऍलोपॅथीमुळे रुग्णांचा मृत्यू झाला हे आपले वक्तव्य दुर्भाग्यपूर्ण आहे अशा स्पष्ट शब्दात सुनावले होते. त्यानंतर रामदेवबाबांनी आपल्या भूमिकेला थोडी मुरड घातली. पण, लागलीच आणखी 25 प्रश्न विचारून हा वाद भडकवला. वास्तविक बाबा रामदेव योगगुरु आहेत. देशातील अनेक लोकांना योगा .द्वारे स्वस्थ राहण्यासाठी प्रोत्साहित करून त्यांनी मोठी कामगिरी केली आहे. भारतीय स्वदेशी औषध आणि इतर वस्तूंची कंपनी स्थापन करून त्यांनी व्यवसायात ही एक आदर्श घालून दिला आहे. मात्र याचा अर्थ देशातील सर्वच व्यवस्थांवर टीका करण्याचा आणि त्यांच्यावर प्रश्नचिन्ह उभे करून त्यांच्याबद्दल लोकांच्या मनात संभ्रम निर्माण करण्याचा अधिकार त्यांना कोणीही दिलेला नाही. ते ज्या प्रकारचा आयुर्वेदिक उद्योग चालवतात त्याच्या बाबतीत असलेले आक्षेप इंडियन मेडिकल असोसिएशनने शासनाने नेमून दिलेल्या यंत्रणांकडे नोंदवलेले आहेत. त्याचप्रमाणे ऍलोपॅथीबाबत रामदेवबाबा यांचे जर काही आक्षेप असतील तर त्यांनीही ते त्या यंत्रणांकडे नोंदवणेच योग्य ठरेल. मात्र तसे न करता बाबा थेट समाज माध्यमांवर आले आणि त्यांनी नको ती वक्तव्ये करण्यास सुरुवात केली. बरं, त्याबाबत खुलासा करताना आपण आपल्या वक्तव्यावर ठाम आहोत हेही बाबांनी दाखवून दिले नाही. आपण जो मजकूर वाचला तो इतर कोणाचा तरी होता आणि ती त्याची भावना आहे. आपण फक्त वाचून दाखवली असा खुलासा त्यांनी केला आहे. एका अर्थाने आपल्याच वक्तव्यापासून बाबांनी घुमजाव केले. त्यातून बाहेर पडल्यानंतर चर्चा सुरू होताच ऍलोपथीमुळे मधुमेह पूर्ण बरा होतो का? उच्च रक्तदाब पूर्ण बरा होतो का अशा प्रकारचे 25 प्रश्न उपस्थित केले. डॉक्टरांच्या संघटनेने आधी आपल्या या प्रश्नांचे उत्तर द्यावे असा बाबांचा आग्रह आहे. तोही पुन्हा समाज माध्यमे आणि वृत्त माध्यमांमध्येच! हे आक्षेप शासनाने निर्माण केलेल्या व्यवस्थेत विचारले गेले तर आयएमए आणि बाबा यांना सक्षम यंत्रणेपुढे आपली बाजू मांडावी लागेल. तिथे दोन्ही बाजूंकडून आलेले पुरावे सादर करता येतील आणि त्यानंतर त्या क्षेत्रातील तज्ञ वास्तव काय आहे याचा खुलासा करू शकतील. मात्र तसे न करता बाबांनी समाज माध्यमात वक्तव्य करून जनतेमध्ये संभ्रम पसरवण्याचे काम केले आहे. आपल्या योग साधना वर्गाच्या वेळी बाबा अनेकदा ऍलोपॅथी आणि त्यामुळे होणाऱया दुष्परिणामांवर बोलत होते. त्या काळात आयएमए किंवा अन्य कोणीही त्यांच्या वक्तव्याची दखल घेतली नाही. कारण, तो काही साथीच्या रोगाला सामोरे जाण्याचा काळ नव्हता. लोकांना ज्यांचे विचार पटले, जी पॅथी योग्य वाटली त्यांनी त्या उपचार पद्धतीचा अवलंब केला. त्यामुळे कोणीही त्यावर आक्षेप घेतला नाही. मात्र सध्या जेव्हा बाबा आक्षेप घेत आहेत तो काळ खरोखरच गंभीर काळ आहे. संपूर्ण जगाची व्यवस्था कोरोना विरोधातील लढाईसाठी ऍलोपॅथीवर अवलंबून आहे. त्यामुळे अशा काळात संभ्रम निर्माण करणे धोकादायक ठरू शकते. लोक उपचारापासून परावृत्त होऊन स्वतःचा आणि कुटुंबाचा जीव धोक्मयात घालू शकतात. बाबांचे ऐकणारा वर्ग मोठय़ा प्रमाणात आहे. त्या वर्गाने ऍलोपॅथी उपचारांकडे पाठ फिरवायचे म्हटले तरी सध्या ते फिरवू शकणार नाहीत. मात्र अशाप्रकारच्या आक्षेपांनी निर्माण झालेला संभ्रम आणि संशयातून उपचाराबाबत वाद निर्माण होणे किंवा अन्य काही दुर्घटना घडणे अशा प्रकारांना वाव मिळू शकतो. देशभर कानाकोपऱयात अशाप्रकारचे अनेक वाद सध्याही सुरू आहेत. बाबांच्या अशा वक्तव्यामुळे त्यात भर पडण्याची शक्मयताच अधिक. काळय़ा पैशापासून ते कोरोनीलपर्यंतच्या रामदेवबाबांच्या प्रत्येक बाबतीतील मताला भारतात सध्या सत्तारूढ असणाऱया पक्षाचे समर्थन लाभलेले आहे. तुम्ही कोरोना योद्धय़ांचा अपमान केलात असे पत्र लिहिणारे आरोग्य मंत्री हर्षवर्धन स्वतः कोरोनीलच्या उद्घाटनासाठी उपस्थित होते. मात्र तरीही नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील संपूर्ण यंत्रणा आज अलोपॅथीवर अवलंबून आहे. अशा प्रकारची दुसरी यंत्रणा इतक्मया झटक्मयात उभी करणे आजच्या क्षणाला तरी शक्मय नाही. अशावेळी बाबा जे आक्षेप जनतेसमोर घेत आहेत त्याचे समर्थन सरकारलाही करता येणे शक्मय नाही, हे डॉ. हर्षवर्धन यांच्या पत्रावरून सिद्ध झालेले आहे. तरीही बाबा प्रकरण रेटून न्यायचा प्रयत्न करत आहेत. त्यांना जे आक्षेप नोंदवावेसे वाटतात ते त्यांनी योग्य व्यवस्थेसमोर नोंदविले पाहिजेत. गावोगावी पसरलेल्या त्यांच्या अनुयायांनी ऍलोपॅथीद्वारे चालवल्या जाणाऱया दवाखान्यात रुग्णांवर झालेल्या अन्यायाविरोधात शासनाने उभ्या केलेल्या सक्षम यंत्रणेकडे तक्रारी नोंदवल्या पाहिजेत. कोणत्याही पॅथीने का असेना कोरोना एकदाचा हद्दपार होऊ देत ही सर्वसामान्य जनतेची आज भावना आहे. देशभर लोकांची चुकीच्या उपचाराबद्दल तक्रार आहे. पॅथीबद्दल नाही. त्या तक्रारींचे समर्थन आयएमएलासुद्धा करता येणार नाही. बाबांनी आपल्या अनुयायांमार्फत चुकीच्या उपचारांचा, जादा पैसे उकळल्याचा फटका बसलेल्या जनतेच्या तक्रारी दाखल करण्यात त्यांनी आपली शक्ती खर्ची घातली पाहिजे. रामदेवबाबांची यंत्रणा जराशा विधायक कामात उतरली तर साथीच्या निमित्ताने जनतेची लूट करणारे जे काही लोक आहेत त्यांना दंड, शिक्षा करणे आणि जनतेला न्याय मिळवून देणे शक्य होणार आहे. त्यामुळे समाज माध्यमावर भलतेच रामदेवायण पसरवण्यापेक्षा बाबांनी आपल्या शक्तीचा विधायक वापर करावा आणि किमान त्यांच्या विचाराचे सरकार असताना तरी विहित पद्धतीने तक्रार करण्याची सवय जडवून घ्यावी, हीच अपेक्षा.
Tarun Bharat Portal
Parasharam Patil is a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in editorial news, local news entertainment, and political content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.