नवी दिल्ली \ ऑनलाईन टीम
पीएनबी घोटाळा प्रकरणातील आरोपी मेहुल चोक्सी गायब झाला आहे. त्याचे वकील विजय अग्रवाल यांनी असा दावा केला आहे की, मेहुल चोक्सी कुठेतरी गायब झाला आहे. यानंतर अँटिग्वा पोलिसांनी त्याचा तपास सुरू केला आहे. स्थानिक पोलिस त्याचा शोध घेत आहेत.
मंगळवारी अँटिग्वाच्या स्थानिक रिपोर्टमध्येही चोक्सी बेपत्ता झाल्याचे सांगितले गेले आहे. स्थानिक अहवालात असा दावा करण्यात आला आहे, की चोक्सी सोमवारी रात्री एका प्रसिद्ध हॉटेलमध्ये डिनर करण्यासाठी घराबाहेर पडला आणि त्यानंतर पुन्हा दिसलाच नाही.
मेहुल चोक्सीवर 4 जानेवारी 2018 ला अँटिग्वाला फरार होण्याआधी पंजाब नॅशनल बँकेसोबत 13,578 कोटीचा घोटाळा केल्याचा आरोप आहे. पीएनबी घोटाळा प्रकरणी चोक्सीविरोधात अटक वॉरंट जारी करण्यात आलं आहे. तो 2013 मध्ये कथितपणे शेअर बाजाराच्या घोटाळ्यातही सामील होता. 2017 मध्ये चोक्सीनं अँटिग्वा आणि बारबुडाची नागरिकता घेतली. यानंतर काही महिन्यांतच घोटाळा समोर आला होता. यंदा मार्च महिन्यात अँटिग्वा आणि बारबुडानं चोक्सीचं नागरिकत्व रद्द करण्याची प्रक्रिया सुरू केली होती. मात्र, चोक्सीनं सरकारच्या या निर्णयाविरोधात न्यायलयात धाव घेतली होती