मुंबई \ ऑनलाईन टीम
कोरोना संदर्भातील आढावा बैठकीनंतर राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी बैठकीत घेण्यात आलेल्या काही महत्वपूर्ण निर्णयांची माहिती दिली. राज्यात कोरोना रुग्णांचं बरं होण्याचं प्रमाण आता ९३ टक्क्यांवर पोहोचलं आहे आणि पॉझिटिव्हीटी रेट १२ टक्क्यांवर आल्याची माहिती त्यांनी आज माध्यमांशी बोलताना दिली.
यावेळी राजेश टोपे म्हणाले की, राज्यात उठसूट कुणाचीही कोरोना चाचणी करणं आता पूर्णपणे बंद करण्यासाठीच्या सक्त सूचना देण्यात आल्या आहेत. कोरोना बाधित व्यक्तीच्या संपर्कातील हाय रिस्क आणि कमी धोका असलेल्या व्यक्तींच्याच कोरोना चाचण्या करण्यात येणार आहेत. ठिकठिकाणी कोरोना चाचण्या केल्यानं पॉझिटिव्हीटी रेटवर परिणाम होतो, अशी माहिती राजेश टोपे यांनी यावेळी दिली. राज्यात कोरोना संदर्भात आशा सेविकांचं योगदान अतिशय महत्वाचं राहिलं आहे. त्यांना आता रॅपिड अँटिजन टेस्टचं प्रशिक्षण देऊन यात त्यांची मदत घेण्यासंदर्भातील निर्णय बैठकीत घेण्यात आल्याचं राजेश टोपे म्हणाले.
याशिवाय कोरोनासोबतच आता म्यूकरमायकोसिसचा धोका वाढत असताना राज्य सरकारचं बारीक लक्ष या सर्व घडामोडींवर आहे. यासोबत म्यूकरमायकोसिसवरील उपचार पूर्णपणे मोफत करण्यात येत असल्याची घोषणा राजेश टोपे यांनी यावेळी केली. म्यूकरवरील औषधांचा तुटवडा निर्माण होत असल्याचं लक्षात आल्यानं त्यासाठी ग्लोबल टेंडरसुद्धा काढण्यात आलं आहे. त्याचबरोबर म्यूकरमायकोसिस संदर्भातील कोणतीही लक्षणं दिसल्यानं दुर्लक्ष न करण्याचं आवाहन त्यांच्याकडून करण्यात आले.
त्याचबरोबर कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेच्या अनुषंगाने करण्यात आलेल्या तयारीचा आढावा घेतला असून त्याबद्दलच्या सूचनाही देण्यात आल्या असल्याचं टोपे यांनी सांगितलं. लसींच्या ग्लोबल टेंडरसंदर्भात बोलताना ते म्हणाले, अद्याप कोणत्याही राज्याच्या लसींच्या ग्लोबल टेंडरला प्रतिसाद मिळालेला नाही. त्यामुळे केंद्राने लसीकरणासंदर्भात राष्ट्रीय धोरण जाहीर करावं.
Previous Articleकर्नाटक: केएसआरटीसी कर्मचाऱ्यांसाठी लसीकरण शिबिरे
Next Article कर्नाटक: मुख्यमंत्री ग्रामपंचायतींशी साधणार संवाद








