प्रतिनिधी / सांगली
उद्या, बुधवार (दि.२६) मे रोजी वैशाख पौर्णिमा असून महा चंद्रोदय पाहण्याची संधी असल्याची माहिती खगोल अभ्यासक डॉ. शंकर शेलार यांनी दिली.
डॉ. शेलार म्हणाले, याच दिवशी गौतम बुद्धांचा जन्म झाला म्हणून भारतीयांना त्याचे विषेश महत्व आहे. तर मे महिन्यात सर्वत्र फुलांना बहर आलेला असतो म्हणून या पौर्णिमेच्या चंद्राचे युरोपीय देशांत ” फ्लावर मून ” म्हणून खास कौतुक असते. त्यात दुग्धशर्करा योग असा की, बुधवारी ‘सुपर मून’ आहे आणि खग्रास चंद्रग्रहणामुळे त्याचा ‘ रेड मून ‘ झालेला काही देशांतून दिसणार आहे. महाराष्ट्रातून मात्र या सुपर मूनचा उदय छायाकल्प ग्रहण (penumbral ) अवस्थेत होत असल्याने बुधवार चे ‘महा चंद्रबिंब ‘ उगवताना काहीसे झाकोळलेले नेहमीपेक्षा थोडेसे मंदप्रभ भासेल. ग्रहण संपल्यानंतर मात्र प्रफुल्लित सुपरमूनचा आनंद लुटता येईल.
५ तास २ मिनिटे चालणारे हे खग्रास चंद्रग्रहण दुपारी २.१७ ला सुरु होऊन सायंकाळी ७.१९ ला संपेल. ग्रहण मध्य ४.४८ ला असेल. खग्रास अवस्था १४ मि. ३० सेकंद टिकेल. हे ग्रहण दुपारी होत असल्याने आपण पाहू शकणार नाही. आपल्याकडे चंद्रोदय होईल तेंव्हा ते संपत आलेले असेल. ७.१९ ला ग्रहण संपेल. भारतातील अतिपूर्वेकडील राज्यांमधून (North East) खंडग्रास चंद्रग्रहण दिसेल, उर्वरित भारतातून विरळ छायेतील चंद्रग्रहण (छायाकल्प ) पाहायला मिळेल. या अवस्थेत नेहमीप्रमाणेच चंद्र दिसतो पण, तेज किंचित कमी जाणवते.
दक्षिण अमेरिकेचा पश्चिम भाग, उत्तर अमेरीका, यू, एस, ए चा पश्चिम भाग तसेच आॅस्टरेलिया ,मध्य पॅसिफिक आणि दक्षिण पूर्व आशिया मधून या ग्रहणाची खग्रास अवस्था दिसेल. तेथून १४ मिनिटे लाल /तपकिरी रंगाचे चंद्रबिंब(Red /Blood Moon) दिसेल.
सुपर मून : चंद्राची सरासरी कक्षा ३ लाख ८४ हजार कि. मी. आहे. तो पृथ्वीच्या जवळ ३लाख ६०हजार कि. मी. पेक्षा जवळ आला असताना पौर्णिमा घडली तर त्या दिवशीच्या चंद्राला सुपरमून म्हणतात. तेंव्हा चंद्राचा आकार नेहमी पेक्षा ६-१४ टक्के मोठा तर तेज १६- ३० टक्के जास्त दिसते. बुधवारी पृथ्वीपासून चंद्र ३,५७,३११ कि. मी. वर आहे.
हे छायाकल्प चंद्रग्रहण सर्वांनी पाहावे. त्यासाठी कोणत्याही उपकरणाची आवश्यकता नाही. कोरोना व्यतिरिक्त अन्य कसलीही भीती बाळगू नये. गरोदर महिलांनी ग्रहण काळात कसलीही पारंपारिक बंधने पाळू नयेत. गर्भातील विकृतीचा ग्रहणाशी संबंध नसतो. उलट ग्रहण पाळणे हे निसर्गाविरुद्ध असून त्यामुळे अनेकदा जिवावर बेतते. असे सांगून डॉ. शेलार म्हणाले, आम्ही महाराष्ट्रातील खगोल प्रेमी मंडळी ग्रहण काळात नेहमीच निरिक्षणाबरोबर अल्पोपहार पार्टीचाही आनंद लुटतो. सर्व अबाल वृद्धांनी बुधवारी छायाकल्पातील सुपर फ्लॉवर मून पहाण्याचा योग अवश्य साधावा. असे आवाहनही डॉ. शेलार यांनी केले आहे.
Previous Articleक्रिस्पी अँड क्रांची मिनी पोटॅटो पॅन केक
Next Article धनगर आरक्षणाचा जागर करूया : आमदार पडळकर








