नवी दिल्ली \ ऑनलाईन टीम
उत्तर प्रदेशमधील गाझियाबाद येथील एका कान, नाक आणि घसा रोग तज्ज्ञ असणाऱ्या डॉक्टरांनी आपल्या निरिक्षणात पिवळ्या बुरशीजन्य ( येलो फंगस) आजाराचा रुग्ण आढळल्याची बाब स्पष्ट केली आहे. ब्लॅक फंगस आणि व्हाईट फंगसपेक्षा येलो फंगस अधिक धोकादायक आणि खतरनाक असल्याचं तज्ज्ञांनी सांगितलं असून सावध राहण्याचं आवाहन केलं आहे.
या पिवळ्या बुरशीला म्युकोर सेप्टिकस हे नाव देण्यात आलं आहे. पिवळ्या बुरशी आढळून आलेला रुग्ण गाझियाबादचा राहणारा आहे. या तरुणाला आधी कोरोनाची लागण झाली होती. तसेच त्याला मधुमेहाचाही त्रास आहे. कान, नाक आणि घसा रोग तज्ज्ञ डॉ. बी. पी. त्यागी त्याच्यावर उपचार करत आहेत.
मानवामध्ये आतापर्यंच पिवळ्या बुरशीचे नमुने पाहिले गेले नव्हते, काही प्राण्यांमध्ये ही बुरशी दिसून आली होती. पण, माणसामध्ये यापूर्वी मात्र असं प्रकरण आढळलं नाही, असं निरिक्षण डॉ. त्यागी यांनी नोंदवलं आहे.
आतापर्यंत काळ्या आणि पांढऱ्या बुरशीचे रुग्ण समोर आल्यामुळे देशावर आणखी एक संकट ओढावत असल्याची बाब चिंतेत टाकून गेली, त्यातच आता हे पिवळ्या बुरशीचं प्रकरण नव्यानं समोर आल्यामुळे आरोग्य क्षेत्राच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.









