विश्वचषक, आशिया चषक पात्र फेरीवर नाही
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
दुबईमध्ये खेळविण्यात आलेल्या दोन आंतरराष्ट्रीय फुटबॉल सामन्यांच्या निकालाचा परिणाम 2022 च्या फिफाच्या विश्व करंडक तसेच 2023 च्या एएफसी आशिया चषक पात्र स्पर्धेवर होणार नाही, असे प्रतिपादन भारतीय फुटबॉल सदस्यांनी केले आहे. भारतीय फुटबॉल संघ सध्या डोहा येथे आगामी सामन्यांसाठी शिबिरात सराव करीत आहे.
कोरोना महामारी समस्येच्या कालखंडानंतर भारतीय फुटबॉल संघ पुन्हा आपल्या सरावाला प्रारंभ केला असून गेल्या मार्चमध्ये झालेल्या दोन आंतरराष्ट्रीय फुटबॉल सामन्यात भारताची कामगिरी म्हणावी तशी समाधानकारक झाली नाही. पहिल्या सामन्यात भारताने ओमानला 1-1 असे बरोबरीत रोखले. दुसऱया सामन्यात संयुक्त अरब अमिरातने भारताचा 6-0 अशा गोलफरकाने दणदणीत पराभव केला होता. आता भारताचा फुटबॉल संघ 3 जून रोजी आशिया चॅम्पियन्स कतारशी लढत देणार आहे. त्याचप्रमाणे भारताचा दुसरा सामना 7 जूनला बांगलादेश बरोबर आणि तिसरा सामना 15 जूनला अफगाण बरोबर होणार आहे. भारतीय फुटबॉल संघाचे डोहामध्ये 19 मे रोजी आगमन झाले. त्यानंतर त्यांना एका हॉटेलमध्ये क्वारंटाईन करण्यात आले आहे. आगामी फिफाच्या विश्व करंडक फुटबॉल स्पर्धेच्या पात्रतेचे भारताचे आव्हान यापूर्वीच संपुष्टात आले आहे. भारतीय संघाने पात्र फेरीच्या स्पर्धेत इ गटात 3 गुणांसह चौथे स्थान मिळविले आहे.









