अध्याय आठवा
अवधूत यदुमहाराजांना म्हणाले, एका वारांगनेलाही मी गुरु केले. मी तिच्यापासून ज्या गोष्टी शिकलो त्या ऐक. पूर्वी जनक राजाच्या नगरीत पिंगला नावाची एक वारांगना रहात होती. ती स्वच्छंदी व स्वैर वागणारी होती. पण तिच्या आशेचे निराशेत कसे रूपांतर झाले, त्यातून तिला तीव्र वैराग्य उत्पन्न झाले ती कथा आता मी तुला सांगतो. पिंगला नावाची अतिशय सुंदर वेश्या होती. ती एकदा रात्रीच्या वेळी एखाद्या पुरुषाला आपल्या जाळय़ात ओढण्यासाठी नटून थटून घराच्या बाहेरच्या दारात उभी राहिली. आधीच रूप उत्तम, त्यात मनोरम शृंगार केलेला! अशातच ती विलासासाठी उत्तम पुरुषाची वाट पहात उभी होती. पिंगलेला पैशाची लालसा होती. त्यामुळे येणाऱया जाणाऱया पुरुषांना पाहून ते धनवान असून धन देऊन आपला प्रियकर होण्यासाठी येत आहेत, असे तिला वाटत होते. गुणवान, रूपवान व धनवान, कामशास्त्रांत निपुण आपली इच्छा पुरविणारा आणि धन देऊन सधन करणारा, असा पुरुष ती पहात होती. पुष्कळ पुरुष येऊन गेले पण कुणी तिच्याकडे पाहिलेसुद्धा नाही. तरीपण न कंटाळता रस्त्याने पुरुष येताना पाहिला की, त्याला ती आपल्या नेत्रकटाक्षाने शृंगाराभिनय प्रकट करून खुणावीत असे. या खुणावण्याच्या अनेक तऱहा तिला अवगत होत्या. येणाऱया पुरुषावर खडा मारायचा, कोणास ‘महाराज! विडा घेऊन जा’ असे म्हणायचे, रस्त्यावरून जाणाऱयाकडे डोळा मोडायचा, कोणापुढे मुरका मारायचा काहीतरी करून इच्छित पुरुष मिळवायचाच या मनात धरलेल्या योजनेनुसार जीवाभावाने वरील प्रकारचे नाना संकेत ती दाखवीत असे. परंतु येणारे जाणारे लोक तिकडे पहात नव्हते. निघून गेलेल्या पुरुषांची ‘हे दरिद्री, दुर्बळ!’ म्हणून ती हेटाळणी करी. आता कोणी तरी द्रव्य देणारा भला खंबीर पैसेवाला येईल तो माझा अंगीकार करून माझी इच्छा पूर्ण करील, असा विचार तिच्या मनात येत होता. अशा आशा-निराशेच्या खेळात रात्र उलटू लागली. झोपमोड झाली तरीसुद्धा ती दरवाजाजवळ ताटकळत उभी होती. अंतःकरण निराशेने भरून गेलेले, उद्वेगामुळे झोप नाही, दार धरून उभी राहिलेली, पुरुषभोग मिळावा म्हणून इच्छा धरून असलेली अस्वस्थ पिंगला कंटाळून घरात गेली. तोवरच कुणाची तर चाहूल लागली असे वाटून बाहेर येई. आत जा, बाहेर ये, पुन्हा आत जा असे हेलपाटे करता करता मध्यरात्र झाली! पुरुष येण्याची वेळ टळली. रात्रीचा भर लोटला. सर्व लोक निदेत अगदी डाराडूर झाले! पण पिंगला कामविव्हल झाली होती. पैशाच्या आशेने चेहरा सुकून गेला. चित्त व्याकूळ झाले आणि तिच्या मनात तीव्र वैराग्य निर्माण झाले. गम्मत पहा तिच्या चिंतेचे कारणच तिच्या सुखाला कारणीभूत ठरले. द्रव्य मिळाले नाही म्हणून अंतरात अगदी दीन झाली. वैराग्याने परम चिंता वाटू लागली व तीच तिच्या सुखस्वार्थाला कारण झाली. मनुष्याची आशारूपी दोरी तोडणारी तलवार म्हणजे वैराग्य. हे राजा! विवेकसागरा! ज्याच्या बुद्धीत वैराग्य नाही, त्याला जन्ममरणाची आधिव्याधी पावलोपावली बाधक होते. ज्याला अनुताप नाही, ज्याच्या अंतःकरणात विवेक उत्पन्न होत नाही, तो संसाराला आंदण दिलेली दासी होय. आशारूप दोरीने तो बांधला जातो. त्याला मोहममतेने आवळलेली देहबुद्धीची बेडी घातलेली असते. तो रात्रंदिवस विषयाचे दळण दळीत असतो. असे लोक वेडेवाकडे भटकू लागून चित्त चळून घोर काळोख्या विहिरीत पडतात तेथून वर निघावयाला त्यांना बिलकूल मार्ग सापडत नाही राजन, जसा अज्ञानी माणूस ममता सोडू इच्छित नाही, त्याचप्रमाणे ज्याला वैराग्य प्राप्त झाले नाही, त्याला शरीर आणि त्याची बंधने तोडून टाकायची इच्छा होत नाही. पिंगलेला वैराग्य कसे झाले पहा. ती ज्या विषयाचे चिंतन करीत होती, त्या विषयसुखालाच ती विटून गेली! सारांश, वैराग्य आशेला संपवून टाकते. आशा माणसाला पंगू बनवते. लाचार बनवते. म्हणून जेवढय़ा लवकर शक्मय असेल तेवढय़ा लवकर माणसाने ‘आशेचा’ त्याग करावा. याबाबत पिंगलेचे मनोगत जाणून घेऊयात पुढील भागात……
क्रमशः







