भाजपमध्ये गेलेल्या सोनाली गुहांचे पत्र
वृत्तसंस्था/ कोलकाता
पश्चिम बंगालमधील निवडणूक संपली असून तृणमूल काँग्रेसने सत्ता राखण्यास यश मिळविले आहे. तर ममता बॅनर्जी पुन्हा मुख्यमंत्री झाल्या आहेत. याचदरम्यान आता तृणमूल काँग्रेस सोडून भाजपमध्ये गेलेल्या माजी आमदार सोनाली गुहा यांनी ममतादीदींना पत्र लिहिले आहे. ज्याप्रकारे मासा पाण्याबाहेर राहू शकत नाही, तशाचप्रकारे मी दीदींशिवाय राहू शकत नसल्याचे त्यांनी पत्रात नमूद केले आहे.
पक्ष सोडल्याबद्दल ममतादीदींनी मला माफ करावे. तुम्ही माफ न केल्यास मी जिवंत राहू शकणार नाही. कृपा करून तृणमूल काँग्रेसमध्ये परतण्याची अनुमती द्यावी. भाजपमध्ये सामील होण्याचा मी चुकीचा निर्णय घेतला होता असे गुहा यांनी ममतादीदींना लिहिलेल्या पत्रात नमूद पेले आहे.

सोनाली गुहा चारवेळा आमदार राहिल्या आहेत. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या मर्जीतील नेत्या म्हणून त्यांना ओळखले जात होते. पण विधानसभा निवडणुकीत तृणमूल काँग्रेसने उमेदवारी नाकारल्याने त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. पण त्यांनी निवडणूक लढविली नव्हती. भाजपचे संघटन मजबूत करण्यासाठी काम करणार असल्याचे त्यांनी म्हटले होते.
भाजपमध्ये सामील होण्याचा माझा निर्णय चुकीचा होता याची जाणीव आता होत आहे. भाजपने माझा वापर करण्याचा प्रयत्न केला, ममतादीदींना बदनाम करण्यासाठी त्यांनी सांगितले, पण मी असे करू शकत नव्हते. तृणमूल काँग्रेसमध्ये पुन्हा सामील होण्यासाठी ममता बॅनर्जींना भेटण्याची तयारी असल्याचे गुहा यांनी म्हटले आहे.









