नागपूर
नागपुरचे सुपूत्र आणि संगीतकार राम -लक्ष्मण जोडीतील संगीतकार लक्ष्मण ऊर्फ विजय पाटील यांचे नागपूर येथे निधन झाले. ते 79 वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी शोभा पाटील, मुलगा संगीतकार अमर पाटील, सुना, नातवंडे, दोन मुली असा आप्त परिवार आहे.
राम कदम व विजय पाटील हे चित्रसृष्टीमध्ये राम-लक्ष्मण या नावानेच प्रसिद्ध होते. राजश्री फिल्मसच्या ‘एजंट विनोद‘ हा या जोडीचा पहिला चित्रपट. 1976 साली आपले जोडीदार राम यांच्या मफत्यू नंतरही लक्ष्मण यांनी राम -लक्ष्मण याच नावाने संगीत दिले. मराठीत दादा कोंडके यांच्या चित्रपटांचे संगीतकार म्हणून ते खूप गाजले. आजपर्यंत त्यांनी सुमारे 75 हिंदी, मराठी व भोजपुरी चित्रपटांना संगीत दिले आहे.
हिंदीत हम से बढकर कौन, सुन सजना, दिवाना तेरे नाम का, पुलीस पब्लिक, हंड्रेड डेज, दिल की बाजी, पत्थर के फुल आदी चित्रपटांना त्यांनी संगीत दिले. 1989 च्या मैने प्यार किया या सलमान-भाग्यश्री अभिनीत चित्रपटाने त्यांना अमाप यश आणि नाव दिले. यासाठी त्यांना फिल्म फेअर पारितोषिक मिळाले. त्या नंतरचे हम आप के है कौन व हम साथ साथ है हे चित्रपट आंतरराष्ट्रीय स्तरावर गाजले.
विजय पाटील यांची सुरुवात नागपुरातील गाजलेल्या कादर ऑर्पेस्ट्रातून झाली. एम. ए. कादर हे त्यांचे बालमित्र. बाबा स्वामी, एम. ए. कादर व विजय पाटील हे तिघे ऑर्पेस्ट्रात गायचे. काही वर्षांनी ते मुंबईला निघून गेले.
त्यांच्या जाण्याने एक हृदयस्थ मित्र गमावला, अशी शोकसंवेदना कादर यांनी व्यक्त केली. एकदा झालेली मैत्री ते शेवटपर्यत जपत. त्यांनीच मला अंतिम न्याय व फौज या चित्रपटात पार्श्वगायनाची संधी दिली. कादर संगीत अकादमीचे उद्घाटन आम्ही त्यांच्या हस्ते केले होते, अशी आठवण कादर यांनी सांगितली.









