घर एक मीटर सरकवा, अन्यथा दीड कोटी दंड भरा
ऑकलंडमध्ये एका व्यक्तीला शेजाऱयाच्या किंचित जमिनीवर स्वतःचे घर तयार करणे चांगलेच महागात पडले आहे. बिल्डरने आता घरमालकाला घर 1 मीटरने सरकविण्यास किंवा दीड कोटी रुपये दंड भरण्यास सांगितले आहे. घरमालकावर या जमीन वादावरून खटलाही सुरू आहे. संबंधित व्यक्तीने शेजाऱयाच्या एक मीटर जागेवर कब्जा केल्याचा आरोप आहे.
ज्या व्यक्तीचे घर आहे त्याचे नाव दीपकलाल आहे. एक मीटरचे अंतर न सोडल्याने दीपकलाल यांना आता लाखो रुपये खर्च करावे लागणार आहेत. लाल यांनी पापाकुरामध्ये घराच्या डिझाइन आणि निर्मितीसाठी पिनेकल होम्ससोबत करार केला होता. 2020 च्या मध्यापर्यंत घर जवळपास पूर्ण झाले होते. पण तीन बेडरुम असलेल्या घराचे काम ऑगस्टमध्ये थांबले कारण कंपनीने बाउंड्री मिक्स-अपचा मुद्दा उपस्थित केला होता.
शेजाऱयाने दीपकलालच्या विरोधात कायदेशीर कारवाई सुरू केली आहे. दीपकलालने स्वतःचे घर सरकवावे किंवा दंडाच्या स्वरुपात सुमारे दीड कोटी रुपये (315000 डॉलर्स) भरावेत अशी मागणी शेजाऱयाने केली आहे. पिनेकल होम्सने हॅमिल्टन येथील कंपनी मुख्यालयाला डिझाइनची जबाबदारी दिली होती. ऑकलंडच्या कौन्सिलने या डिझाइनला मंजुरी दिली होती, यामुळे कौन्सिल याकरता जबाबदार असल्याचा दावा दीपक लाल यांनी केला आहे.









