हेस्कॉमचे 20 कर्मचारी करताहेत वीजपुरवठा सुरळीत : गोवा राज्यात चक्रीवादळामुळे मोठय़ा प्रमाणात नुकसान, दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर सुरू
प्रतिनिधी / बेळगाव
तौक्ते चक्रीवादळाने गोव्यासह किनारपट्टी भागाला जोरदार दणका दिला. सोसाटय़ाच्या वाऱयासह पाऊस झाल्याने गोव्याचे मोठे नुकसान झाले आहे. यामध्ये झाडे कोसळून विद्युतवाहिन्या, ट्रान्सफॉर्मर, खांब यांचे नुकसान झाले आहे. रविवारपासून गोव्याचा बराचसा भाग अंधारात असल्याने गोव्याच्या मदतीला बेळगाव येथील हेस्कॉमचे कर्मचारी धावून गेले आहेत. हे कर्मचारी गोव्यातील वीजपुरवठा सुरळीत करण्यास मदत करीत आहेत.
बेळगाव जिल्हय़ाच्या शेजारीच असणाऱया गोवा राज्यात चक्रीवादळाने नुकसान झाले आहे. रविवारी झालेल्या या चक्रीवादळाने गोव्याच्या किनारपट्टी भागात हाहाकार माजविला. यामुळे तेव्हापासून येथील गावे अंधारात आहेत. लवकर सुरळीत वीजपुरवठा करण्यासाठी गोवा सरकारने कर्नाटककडे मदत मागितली. कर्नाटक विद्युत मंडळाने हेस्कॉमच्या कर्मचाऱयांना पाठविण्याचा निर्णय घेतला. बेळगाव व चिकोडी विभागातील प्रत्येकी दहा कर्मचारी व दोन ज्युनियर इंजिनिअर गुरुवारी गोव्याकडे रवाना झाले.
शुक्रवारपासून या कर्मचाऱयांनी प्रत्यक्ष कामाला सुरुवात केली आहे. स्थानिक वीज कर्मचाऱयांच्या मदतीने दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. गुरुवारी हे कर्मचारी रवाना झाले. त्यावेळी त्यांना शुभेच्छा देण्यासाठी बेळगाव विभागाचे अधीक्षक अभियंते गिरधर कुलकर्णी, कार्यकारी अभियंते एम. टी. अप्पण्णावर, साहाय्यक कार्यकारी अभियंते विनोद करूर यांच्यासह इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
यापूर्वी ओडिसा येथेही मदत
तीन वर्षांपूर्वी ओडिसा येथेही वादळामुळे मोठे नुकसान झाले होते. त्यावेळी देशभरातून ओडिसाला मदतीचा हात देण्यात आला. त्यावेळी हेस्कॉमचेही कर्मचारी ओडिसा येथे सुरळीत वीजपुरवठा करण्यासाठी पाठविण्यात आले होते. ओडिसा सरकारने हेस्कॉमच्या कार्याचे कौतुक केले होते.









