बेंगळूर/प्रतिनिधी
बेंगळूर पोलिसांनी मंजुनाथनगर येथील सार्वजनिक आरोग्य केंद्रात (पीएचसी) काम करणाऱ्या डॉक्टरला लसीच्या कुपी चोरी केल्याप्रकरणी अटक केली आहे. डॉक्टर सार्वजनिक आरोग्य केंद्रातील लसीच्या कुपी चोरून तिच्या सहकाऱ्याच्या घरी लसीकरण करत असे. पोलिसांना याविषयी माहिती मिळताच त्या डॉक्टरला अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंजुनाथनगर पीएचसी येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. पुष्पिता (वय २५) आणि तिची सहकारी प्रेमा (वय ३४) ह्या कोविशील्ड लसीच्या कुपी चोरून लसीकरण करत होत्या. लसीकरणासाठी त्या ५०० रुपये शुल्क आकारत असत. डॉक्टर पीएचसीतील लसीच्या कुपी चोरी करत आणि प्रेमाच्या घरी दररोज संध्याकाळी चारच्या सुमारास लसीकरण करीत असत.
दरम्यान कारवाईनंतर बोलताना पोलीस उपायुक्त (पश्चिम) डॉ संजीव एम. पाटील यांनी, “मंजुनाथनगरच्या पीएचसीला पात्र नागरिकांना मोफत लसीकरणासाठी दिल्या जाणाऱ्या कोविशील्ड लसीच्या कुपी चोरून त्या प्रेमाच्या निवासस्थानी नेण्यात आल्या आणि डॉ. पुष्पिता यांनी चोरलेल्या लसी नागरिकांना देऊन त्यांच्याकडून ५०० रुपये शुल्क आकारले. प्रेमाच्या घरी दररोज संध्याकाळी ४ च्या सुमारास लसीकरण होत असे. साक्षीदारांच्या माहितीच्या आधारे आम्ही दोघांना अटक केली असून या रॅकेटमध्ये इतर काही लोक सामील आहेत काय याचा शोध घेत आहोत, असे त्यांनी सांगितले.