चांदीची चहादाणी, परशुराम भाऊंनी मिरजेतून युध्दभूमीवर मागवला चहा
शंभर वर्षांपूर्वी मिरजेत गाजलं चहाचं ग्रामण्य,
नामजोशींबरोबर चहा पिणाऱ्या त्रिंबक साठेंच्या घरावर बहिष्कार
मानसिंगराव कुमठेकर / मिरज
आज जागतिक चहा दिन.. त्यानिमित्ताने चहाच्या इतिहासाची चर्चा होत आहे. मिरज शहरात चहा हे पेय पेशवाईच्या उत्तरार्धात आल्याचे आढळून येते. प्रसिध्द सरदार परशुरामभाऊ पटवर्धन यांनी सन १७९९ मध्ये मिरजेतून चहा मागविल्याची नोंद आहे. त्यामुळे सुमारे २२१ वर्षे चहा हे पेय मिरजकरांची तल्लफ भागवत आहे. तर, चहा पिण्यावरून शंभर वर्षांपूर्वी मिरजेत मोठे ग्रामण्य प्रकरण उद्भवले होते. किर्लोस्कर नाटक मंडळीचे तत्कालीन मॅनेजर त्रिंबक साठे यांच्या घरावर मिरजेतील ब्राम्हणांनी बहिष्कार घातला होता. अनेक शतकांपासून भारतात चहा हे लोकप्रिय पेय आहे. पूर्वी टपरीवर मिळणाऱ्या चहांचे विशेष ब्रॅन्डस ही तयार झाले आहे. त्यांच्या शाखा निरनिराळ्या शहरांतून चहाशौकिनांची तल्लफ भागवत आहेत.
मात्र, मिरज शहरात चहा हे पेय पेशवाईच्या उत्तरार्धात आल्याचे आढळून येते. सन १७९९ मध्ये प्रसिद्ध सरदार परशुरामभाऊ पटवर्धन यांनी युध्द भूमीवरून मिरजेस आपले पुतणे गंगाधरराव बाळासाहेब पटवर्धन यांना पत्र पाठवून चहा आणि चहादाणी मागविली होती. १५ एप्रिल १७९९ च्या या पत्रातील मागणीनुसार बाळासाहेब पटवर्धन यांनी २२ एप्रिल रोजी चहा व चांदीचे पात्र परशुराम भाऊंकडे रवाना केल्याची नोंद आहे. या नोंदीनुसार सुमारे २२१ वर्षांपूर्वी चहा हे पेय मिरजेत आल्याचे दिसून येते.
चहामुळे मिरजेत उद्भवले ग्रामण्य
एकमेकांना एकत्र आणणारा हाच चहा मात्र, काही व्यक्तींना त्रासदायक ठरला होता. सन १८९१ मध्ये पुण्यात पंचहौद मिशनमध्ये चहा घेतल्याने पुण्यातील ४२ व्यक्तींवर जातीबहिष्कृतपणाचे ग्रामण्य सुरू होते. याच प्रकरणातील एक सदस्य नामजोशी हे २९ सप्टेंबर सन १८९२ रोजी मिरजेत आले. त्यावेळी रेल्वे स्टेशनवर त्यांनी रिफ्रेशमेंट रूममध्ये त्रिंबकराव साठे यांच्याबरोबर चहा घेतला. त्रिंबकराव साठे हे प्रसिध्द अशा किर्लोस्कर नाटक मंडळीचे मॅनेजर होते. त्यांनी ‘पंचहौद’ प्रकरणातील व्यक्ति बरोबर चहा घेतल्याने मिरजेतील भिक्षुक मंडळीने त्यांच्यावर बहिष्कार टाकला. तीन-चार वर्षे त्यांच्या घरी श्राध्द, महालय, श्रावणी व अन्य विधी करण्यास ब्राम्हण येत नसत. प्रख्यात नाटककार गोविंद बल्लाळ देवल हे हरिपूरमधून जरूरीपुरते भिक्षुक आणून साठेंच्या घरची धर्मकृत्ये करीत. मिरजेतील या ग्रामण्याची काही कागदपत्रे मिरज इतिहास संशोधन मंडळाच्या संग्रहात आहेत.
सन १८९५ मध्ये साठे यांच्या मातोश्रींचे निधन झाले. मध्यरात्रीची वेळ होती. नाट्याचार्य देवल हे साठेंच्या घरीच होते. मात्र, अंत्येष्टीसाठी भिक्षुक आवश्यक होता. मिरजेतल्या मंडळींनी तर बहिष्कार टाकला होता. रात्रीच्या वेळी मिरजेपासून दूर असणाऱ्या हरिपूरमधून भिक्षुक आणणेही अवघड होते. त्यामुळे नाट्याचार्य देवल यांनीच रात्रीच्या त्या समई अंत्येष्टीची पोथी कुणाकडून स्वतःच अंत्येष्टीचे विधी करण्याचे ठरवून मंत्राग्नीचे पाठ एकदा वाचून घेतले. साठेंच्या मातोश्रीची अंतयात्रा मध्यरात्रीनंतर तीन मैलावर असलेल्या कृष्णा नदीवर पोहचली. तितक्यात हरिपूरचे रावजी भटजी टांग्यातून येऊन त्यांनी मंत्राग्नीचा संस्कार केला. पुण्यातील पंच हौद प्रकरणाचा मिरजेशी अर्थाअर्थी काही संबंध नसताना केवळ नामजोशींबरोबर चहा पिल्याने त्रिंबकराव साठें सारख्या एका प्रतिष्ठीत गृहस्थावर ही वेळ आली होती. एका चहामुळे हा प्रसंग साठे कुटुंबावर सलग तीन-चार वर्षे ओढवला होता.








