प्रतिनिधी/ रत्नागिरी
रत्नागिरी जिल्हय़ात तौक्ते चक्रीवादळामुळे शेकडो घरे, गोठय़ांचे, आंबा, काजू व इतर झाडांचे मोठे नुकसान झाले असून बुधवारपर्यंत 80 टक्के पंचनामे पूर्ण झाले आहेत. यात पावणेचार कोटींचे नुकसानीची नोंद झाली आहे. गुरूवारी जिह्यातील 100 टक्के पंचनामे पूर्ण होतील, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी दत्तात्रय भडकवाड यांनी दिली.
चक्रीवादळानंतर जिल्हा प्रशासनाने पंचनामे करण्याचे काम युध्दपातळीवर सुरू केले. अवघ्या चार दिवसात पंचनामे पूर्ण करून लवकरात-लवकर नुकसान भरपाई देण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. पंचनामे गुरूवारी पूर्ण होतील, असा विश्वास निवासी उपजिल्हाधिकारी दत्तात्रय भडकवाड यांनी व्यक्त केला.
जिल्हय़ात सरासरी 20.22 मिमि पावसाची नोंद
रत्नागिरी जिल्हय़ात सरासरी 20.22 मिमि तर एकूण 182 मिमि पावसाची नोंद झाली आहे. मंडणगड 0, दापोली 23 मिमि, खेड 3 मिमि, गुहागर 8 मिमि, चिपळूण 18 मिमि, संगमेश्वर 11 मिमि, रत्नागिरी 43 मिमि, लांजा 20 आणि राजापूर तालुक्यामध्ये 56 मिमि पावसाची नोंद झाली आहे.









