तेजीच्या प्रवासाला विराम – सेन्सेक्स 291 अंकांनी घसरला
वृत्तसंस्था/ मुंबई
भारतीय भांडवली बाजारात चालू आठवडय़ातील दोन दिवसांच्या तेजीच्या प्रवासाला तिसऱया सत्रात नफा वसुलीमुळे बुधवारी विराम मिळाला आहे. जागतिक बाजारांमधील नकारात्मक वातावरणाच्या प्रभावामुळे भारतीय बाजारातील सेन्सेक्स 291 अंकांनी प्रभावीत राहिल्याची माहिती आहे. दिवसभरातील कामगिरीनंतर बुधवारी एचडीएफसी बँक, एचडीएफसी लि., आयसीआयसीआय बँक आणि कोटक बँक यांचे समभाग नुकसानीत राहिले आहेत.
दिवसभरातील कामगिरीनंतर बीएसई सेन्सेक्स दिवसअखेर 290.69 अंकांसह 0.58 टक्क्यांनी घसरुन 49,902.64 वर बंद झाला आहे. तर दुसऱया बाजूला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 77.95 अंकांसह 0.52 टक्क्यांनी प्रभावीत होत निर्देशांक 15,030.15 वर बंद झाला आहे.
दिग्गज कंपन्यांच्या कामगिरीमध्ये सेन्सेक्समध्ये बजाज फिनसर्व्हचे समभाग दोन टक्क्यांनी घसरले आहेत. यासोबतच एचडीएफसी, महिंद्रा ऍण्ड महिंद्रा, भारती एअरटेल, अल्ट्राटेक सिमेंट आणि कोटक बँक यांचे समभाग घसरणीत राहिले आहेत. दुसऱया बाजूला सन फार्मा, नेस्ले इंडिया, टेक महिंद्रा, बजाज ऑटो आणि ऍक्सिस बँक यांचे समभाग नफ्यात राहिल्याची नोंद केली आहे.
अन्य घडामोडींचा विचार केल्यास यामध्ये जागतिक पातळीवरील प्रमुख शेअर बाजारात घसरण राहिल्याचा नकारात्मक परिणाम हा भारतीय भांडवली बाजारावर राहिल्याने बीएसई सेन्सेक्स व एनएसई निफ्टीच्या समभागांमध्ये नफा वसुली झाल्याच्या कारणास्तव निर्देशांक घसरणीत राहिल्याचे अभ्यासकांनी म्हटले आहे.
प्रमुख क्षेत्रांची कामगिरी
बुधवारच्या सत्रात शेअर बाजारात नफा कमाईचे वातावरण स्पष्ट दिसत होते. यामध्ये औषध, रियल्टी आणि आयटी या क्षेत्रांना वगळता प्रमुख समूहाचा निर्देशांक घसरणीत राहिला होता. जागतिक बाजारात शांघाय आणि टोकीयो हे नुकसानीत राहिले.








