गोपाल शर्मा यज्ञकुंडासहीत उतरले थेट रस्त्यावर
ऑनलाईन टीम / अलाहाबाद
कोरोनाने जगभर थैमान घातले आहे. ही आपत्ती थांबवण्यासाठी जगभरातून संशोधक आपले कौशल्य पणाला लावत उपाय शोधण्यासाठी अहोरात्र मेहनत घेत आहेत. एकीकडे विज्ञानाच्या आधारे कोरोनावर मात करण्यासाठी झटत असताना दुसऱ्या बाजूला मात्र अशातच उत्तर प्रदेशमधील मेरठ येथे भाजपचे नेते गोपाल शर्मा यांनी कोरोना व्हायरसला नष्ट करण्यासाठी एक अजब उपाय शोधला आहे. गोपाल शर्मा यांनी यज्ञ कुंडातील धुरापासून आणि शंख नादातून कोरोना विषाणू संपवता येऊ शकतो, असा अजब दावा केला आहे. यासंबंधी एक व्हिडिओ देखील त्यांनी सोशल मीडियावर शेअर केला आहे.
या यज्ञामध्ये शंखनाद करत गोवऱ्या, देशी गायीचे तूप, आंब्याच्या झाडांच्या काड्या, कापूर या सगळ्याच हवन पेटवण्यात आल्याचं शर्मा यांनी सांगितले आहे. तसेच या यज्ञ कुंडातील निघणाऱ्या धुरामूळे हवा शुद्ध तर होतेच याचबरोबर हानिकारक विषाणू नष्ट होतात. तसेच ऑक्सिजन देखील वाढतो, असा दावा शर्मा यांनी केला आहे. यामुळे नागरिकांतून आश्चर्य व्यक्त केले जातं आहे.
असाच एक उपाय भाजपच्या भोपाळमधील खासदार प्रज्ञा ठाकूर यांनी सूचवला होता. गोमूत्र प्यायल्याने कोरोना होत नसल्याचा दावा केला होता. यानंतर सोशल मिडीयावर बरीच व्हायरल होत यावर नागरिकांनी आपली मते व्यक्त केली होती.