बेंगळूर/प्रतिनिधी
बेंगळूर विमानतळ येथे १५० बेडचे ऑक्सिजनयुक्त कोविड केअर सेंटर सुरु करण्यात आले. या कोविड केअर सेंटरचे उद्घाटन राज्याचे मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी राज्याचे आरोग्यमंत्री डॉ. के सुधाकर आणि अधिकारी उपस्थित होते. याठिकाणी सौम्य हायपोक्सिया असलेल्या रूग्णांवर उपचार करण्यात येणार आहेत.
विमानतळ अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, हे ट्रान्झिट ऑक्सिजन वितरण केंद्र म्हणून तयार केले गेले आहे, जे “रूग्णालयात प्रवेश घेईपर्यंत ऑक्सिजनची आवश्यकता असणाऱ्या रुग्णांना आवश्यक उपचार आणि आराम देईल.”
बेंगळूर शहरी जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असताना बऱ्याच रुग्णांना बेड उपलब्ध होत नाहीत. वेळेवर बेड उपलब्ध होत नसल्याने रुग्णांवर उपचार करण्यास उशीर होत आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत बहुतांश रुग्णांना ऑक्सिजनच्या बेडची आवश्यकता भासत आहे. पण बऱ्याच वेळेला रुग्णालयांमध्ये ऑक्सिजन बेड मिळणे शक्य होत नाही. परंतु जिल्ह्यात ऑक्सिजन बेडची गरज ओळखून अनेक ठिकाणी ऑक्सिजनयुक्त कोविड केअर सेंटर सुरु केली आहेत. त्यामुळे रुग्णांना अशा कोविड सेंटरचा आधार मिळत आहे.