प्रतिनिधी / बेळगाव
शहरात कोरोना बाधितांची संख्या वाढत असल्याने मृत्यूचे प्रमाण वाढले आहे. कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी लॉकडाऊन करण्यात आले आहे. याची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यासाठी रस्त्यांवर व चौकात बॅरिकेड्स लावून वाहतूक बंद करण्यात आली आहे. मात्र, याचा फटका सायकलस्वार आणि पादचाऱयांना बसत आहे. बॅरिकेड्स ओलांडण्यासाठी सायकलस्वार आणि पादचाऱयांना कसरत करावी लागत आहे.
कोरोचा विषाणूचा प्रसार झपाटय़ाने होत असून गल्लोगल्ली कोरोनाबाधित आढळून येत आहेत. कोरोनाबाधितांचा आकडा वाढत असल्याने नियंत्रणासाठी राज्य शासनाने लॉकडाऊन केले आहे. त्यामुळे लॉकडाऊनची अंमलबजावणी काटेकोरपणे करण्यात येत आहे. त्याकरिता रस्त्यावर ठिकठिकाणी बॅरिकेड्स लावून रस्ते बंद करण्यात आले आहेत. दुचाकी वाहने घेऊन अनावश्यक फिरणाऱयांना ब्रेक लावण्यासाठी पोलीस प्रशासनाने शहरातील चौकात बॅरिकेड्स लावून रस्ते बंद ठेवले आहेत. त्याचप्रमाणे काही नागरिकांनी गल्लीतील रस्त्यांवर अडथळे निर्माण करून रस्ते बंद ठेवले आहेत. पण याचा फटका नागरिकांना बसत आहे. सध्या सकाळी सहा ते दहा वाजेपर्यंत अत्यावश्यक सेवा सुरू ठेवण्यात आल्या आहेत. भाजी खरेदी, दूध घेण्यासाठी केवळ पायी जाण्याची मुभा देण्यात आली आहे. पण काही ठिकाणी लावण्यात आलेल्या बॅरिकेड्समुळे पादचाऱयांना पायी चालत जाणेदेखील मुश्कील बनले आहे.
सध्या कोरोना बाधितांची संख्या वाढत असल्याने विविध दवाखान्यांमध्ये दाखल करण्यात आले आहेत. पण कोरोना बाधितांच्या नातेवाईकांना बॅरिकेड्सचा अडथळा निर्माण होत आहे. संगोळ्ळी रायण्णा चौकात आरटीओशेजारील दोन्ही रस्त्यांवर बॅरिकेड्स लावण्यात आले आहेत. दवाखाना किंवा अन्य कामाकरिता सायकलवरून ये-जा करताना बॅरिकेड्सची अडचण होत आहे. या ठिकाणी लावण्यात आलेल्या बॅरिकेड्समुळे दुचाकी वाहनधारक पर्यायी रस्त्यांचा अवलंब करीत आहेत. पण सायकलस्वार आणि पादचाऱयांना जिल्हाधिकारी कार्यालय किंवा अशोक चौकाला वळसा घालून ये-जा करणे अशक्मय आहे. त्यामुळे सायकलस्वारांना बॅरिकेड्सच्या खालून सायकल वाकवून कसरत करीत ये-जा करावी लागत आहे. किमान सायकलस्वार आणि पादचाऱयांना तसेच रुग्णालयात जाणाऱया नागरिकांना ये-जा करण्यासाठी रस्ता मोकळा ठेवावा, अशी मागणी होत आहे.









