मात्र, राज्य शासनाकडून अधिकृत आदेश नाही : परराज्यांतून येणारे, कोरोनाची लक्षणे असलेले-क्वारंटाईन नागरिकांवर लक्ष आदी जबाबदाऱया
प्रतिनिधी / बेळगाव
कोरोना विषाणूंचा प्रसार वाढत चालला असून, दिवसेंदिवस कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढत चालला आहे. अशातच परराज्यांतून येणाऱया नागरिकांची संख्यादेखील वाढत आहे. त्यामुळे कोरोनावर नियंत्रण ठेवण्यासह घरोघरी कोरोनाबाधित नागरिकांवर नजर ठेवण्यासाठी वॉर्डस्तरीय टास्कफोर्स कमिटी स्थापन करण्याची सूचना महापालिकेला करण्यात आली आहे.
कोरोना विषाणूंचा प्रसार रोखण्यासाठी राज्य शासनाने लॉकडाऊनची घोषणा केली आहे. त्यानुसार राज्यात महिन्यापासून संपूर्ण व्यवहार ठप्प झाले आहेत. सामाजिक अंतर राखणे, तोंडाला मास्क लावणे अशा सूचना करण्यात आल्या आहेत. पण सहसा याचे पालन काटेकोरपणे होत नसल्याचे निदर्शनास आले आहे. परराज्यांतून येणाऱया नागरिकांची संख्या वाढत चालली आहे. महाराष्ट्रासह बेंगळूर शहरात कोरोनाग्रस्तांची संख्या वाढली असल्याने शहरातील नागरिकांचा कल आपल्या मूळ गावी परतण्याकडे वाढला आहे. त्यामुळे शहरात पुणे, मुंबई, बेंगळूर अशा विविध शहरांतून येणाऱया नागरिकांची संख्या वाढली आहे. त्यामुळे बेळगावमध्ये दाखल झालेल्या नागरिकांना कोरोनाची लागण झाल्याचे आढळून आले आहे. कोरोनाची लागण झालेले रुग्ण रुग्णालयामधून घरी परतले आहेत. मात्र, अलीकडे कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. मृत्यूच्या प्रमाणातदेखील वाढ झाली आहे. सध्या रुग्णालयात बेड मिळत नसल्याने कोरोनाबाधित घरीच उपचार घेत आहेत. पण काही रुग्णांची स्थिती गंभीर बनत असून ऑक्सिजनअभावी मृत्यू होत आहे. ऑक्सिजनअभावी मृत पावणाऱयांची संख्या वाढली आहे.
कमिटीकडे विविध जबाबदाऱया
घरोघरी उपचार घेणाऱयांची माहिती शासनाला मिळत नाही. सध्या मंगळूर महापालिकेने वॉर्डस्तरीय टास्कफोर्स समिती स्थापन करून माहिती घेण्यासह नगर आरोग्य केंद्राच्या माध्यमातून घरोघरी जावून उपचार करण्यात येत आहेत. त्यामुळे मंगळूरच्या धर्तीवर राज्य शासनाने वॉर्डस्तरीय टास्कफोर्स कमिटी नियुक्त करण्याची सूचना केली आहे. प्रत्येक वॉर्डमध्ये आरोग्य विभागाच्या अधिकाऱयांच्या नेतृत्वाखाली टास्कफोर्स कमिटी स्थापन करण्याची सूचना महापालिकेला केली आहे. वॉर्डचे स्वच्छता निरीक्षक, महसूल निरीक्षक, बिल कलेक्टर, आशा कार्यकर्त्या, संबंधित विभागातील आरोग्य खात्याचे अधिकारी व कर्मचारी तसेच स्वसाहाय्य संघटना, सामाजिक संघटना आदींची कमिटी करण्याची सूचना करण्यात आली आहे. परराज्यांतून येणाऱया नागरिकांची माहिती घेणे तसेच कोरोनाची लक्षणे असलेल्या नागरिकांची माहिती आरोग्य विभागाला देणे, क्वारंटाईन केलेल्या नागरिकांवर लक्ष ठेवणे अशा विविध जबाबदाऱया टास्कफोर्स समितीच्या असणार आहेत.
सदर टास्कफोर्स समितीची स्थापना तातडीने करावी, अशी सूचना करण्यात आली आहे. यामुळे कोविड-19 च्या कामात व्यस्त असलेल्या मनपा अधिकाऱयांवर जबाबदारी वाढली आहे. पण नगर आरोग्य पेंद्राचा कारभार आरोग्य खात्याकडे असून लसीकरण करणे, कोरोनाची चाचणी करणे आदी कामाची जबाबदारी आरोग्य केंद्राच्या कर्मचाऱयांवर सोपविली आहे. त्यामुळे टास्कफोर्स समितीकरिता कर्मचाऱयांची अडचण भासणार आहे. 58 वॉर्डकरिता आरोग्य खात्याचे कर्मचारी अपुरे पडण्याची शक्मयता असल्याने टास्कफोर्स समिती स्थापन करण्याचा पेच मनपा प्रशासनासमोर निर्माण झाला आहे.
हालचाली नाहीत
वॉर्डस्तरीय टास्कफोर्स समिती स्थापन करण्याचा अधिकृत आदेश नगर विकास खात्याने मागील वषी दिला होता. त्यानुसार मनपा आयुक्त जगदीश के. एच. यांनी मनपा अधिकारी व कर्मचाऱयांची नियुक्ती करून टास्कफोर्स समिती स्थापन केली होती. मात्र, कोरोना बाधितांची संख्या कमी झाल्याने काम थांबले होते. पण यंदा याबाबत कोणताच आदेश दिला नाही. त्यामुळे मनपाने वॉर्डस्तरीय टास्कफोर्स समिती स्थापन करण्याबाबत कोणत्याच हालचाली चालविल्या नाहीत.









