प्रतिनिधी/ रत्नागिरी
तौक्ते चक्रीवादळामुळे रत्नागिरी जिह्यात महावितरणला जबर फटका बसला. कोरोनाची साथ असताना वैद्यकीय उपचार अत्यावश्यक असतानाच वीजपुरवठा खंडित झाल्याने मोठे प्रश्न उभे राहिले आहेत. रत्नागिरी जिह्यातील 39 कोविड हॉस्पिटल्सपैकी 23 ठिकाणी वीज पुरवठा पूर्ववत झाला असून 16 ठिकाणी तो पूर्ववत होण्यासाठी युद्ध पातळीवर प्रयत्न सुरु आहे. जिह्यात तब्बल 5 लाख 45 हजार 120 वीज वीजकनेक्शन्स बंद पडली आहेत.
रत्नागिरी जिह्यात चक्रीवादळामुळे वीज वितरणव्यवस्था मोठय़ा प्रमाणात बाधित झाली. त्यामध्ये 1 हजार 239 गावातील एकूण 5 लाख 45 हजार 120 वीज कनेक्शन्स बंद पडली असून ती सुरू करण्यासाठी कंपनीचे 71 अधिकारी, 910 कर्मचारी, 33 कंत्राटी टीम आणि 304 कामगार युध्दपातळीवर काम करत असल्याचे महावितरणचे मुख्य अभियंता देवेंद्र सायनेकर यांनी सांगितले.
वीजपुरवठा सुरू न झाल्याने रात्रभर वादळाच्या जोडीला अंधाराचा तडाखा रत्नागिरीकरांनी सहन केला. किनारी भागातील ग्रामस्थांनी रात्र जागून काढली. जिह्यातील सुमारे 2 लाख नागरिक अंधारात होते. महावितरणच्या यंत्रणेचे या वादळात मोठे नुकसान झाले आहे. 17 मे दुपारी 3 वाजता महावितरणकडून नुकसानाचा गोषवारा जाहीर करण्यात आला. जिल्ह्य़ातील एकूण 1 हजार 239 गावांतील वीजपुरवठा बंद पडला. त्यापैकी 479 गावांतील वीजपुरवठा सोमवारी दुपारपर्यंत सुरळीत करण्यात यंत्रणेला यश आले. उर्वरित 760 गावातील वीजपुरवठा सुरू करण्यासाठी युध्दपातळीवर प्रयत्न सुरु असल्याचे सांगण्यात आले. जिल्हय़ात एकूण 55 उपक्रेंद्रांना वादळासह पावसाचा फटका बसला. त्यापैकी 27 सुरू तर 28 बंद आहेत. या वादळात बंद पडलेले 7 हजार 548 ट्रान्सफॉर्मरपैकी 1 हजार 883 सुरू झाले असून 5 हजार 665 सुरू सुरु करण्याचे काम सुरु असल्याचे सांगण्यात आले.
जिल्हय़ातील 5 लाख 45 हजार 120 पैकी 1 लाख 87 हजार 711 वीज कनेक्शन सुरू करण्यात आली असून 3 लाख 57 हजार 409 सुरू होणे बाकी आहेत. यात 164 एचटी तर 391 एलटी पोल बाधित झाले आहेत. 49 किलोमीटरच्या एचटी लाईन व 117 किलोमीटर अंतरातील एलटी लाईन आणि 15 ट्रान्सफार्मर नादुरूस्त झाले. या वादळात जिल्ह्य़ातील कोविड सेंटर असलेल्या 39 ठिकाणी वीजपुरवठा खंडित झाला होता. पैकी 23 ठिकाणी पुन्हा वीज सुरू झाली असून 16 ठिकणी सुरू होणे बाकी आहे. सर्वच्या सर्व 3 ऑक्सीजन प्लॅन्ट्स पुन्हा सुरू झाले आहेत. ही माहिती रविवारी दुपारपर्यंत झालेल्या सर्वेक्षणानुसार असून यात आणखी वाढ होऊ शकते. महावितरण कंपनीचे मुख्य अभियंता देवेंद्र सांयनेकर, कार्यकारी अभियंता रामलिंग बेले, शिवतारे आणि कैलास लवेकर प्रत्यक्ष कामाचे ठिकाणी उपस्थित असून परिस्थिती पूर्व पदावर आणण्यासाठी प्रयत्नशील आहेत.
संगमेश्वर तालुक्यात वीजपुरवठा सुरळीत होण्यासाठी 8 दिवस लागणार
संगमेश्वर वार्ताहरने कळवल्यानुसार वादळामध्ये संगमेश्वर तालुक्यातील जवळपास 200 विद्युत पोल कोसळले असून संपूर्ण तालुक्यात विद्युत पुरवठा सुरळीत होण्यास सुमारे आठ दिवस लागण्याची शक्यता असल्याचे महावितरण कडून सांगण्यात आले आहे.
वादळामुळे विद्युत वाहिन्यांवर झाडे पडून विद्युत पुरवठा खंडित झाला आहे. रविवारी सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास वीज पुरवठा खंडित करण्यात आला. आरवलीहून 33 केव्ही वाहिनीमध्ये बिघाड झाला असून संगमेश्वर महावितरणचे पिरजादे यांनी कर्मचाऱयांसह दुरुस्तीचे काम सुरू केले आहे. 33 के व्ही लाईन दुरुस्त झाल्यावर 11 केव्ही लाईन दुरुस्त करण्याचे काम हाती घेण्यात येणार आहे. गाव-वाडय़ातून जाणाऱया वाहिन्या तपासूनच तेथील विजपुरवठा सुरू करण्यात येणार असल्याने संपूर्ण तालुक्यातील पुरवठा सुरळीत होण्यास आठ दिवस लागण्याची शक्यता आहे.
दापोली कोव्हीड सेंटरचा वीजपुरवठा सर्वात आधी सुरळीत करणार
दापोली शहरातील काळकाई कोंड येथील पाण्याच्या टाकी समोर आंब्याचे झाड दापोली शहराला वीज पुरवठा करणाया मुख्य वाहिनीवर सोमवारी सकाळी कोसळले. यामुळेही वीजवाहिनी तुटली व विजेचे खांब वाकडे झाले होते. हे वाकलेले खांब करण्याचे बदलण्याचे काम महावितरणने सर्वात आधी युद्धपातळीवर पूर्ण केले. हे काम दुपारपर्यंत सुरू होते. यानंतर दापोलीला वीज पुरवठा करणाया खेड वरून येणाया मुख्य वीज वहिनीच्या तपासणीला सुरुवात करण्यात आली. यानंतर दापोली शहरातील कोव्हीड सेंटरचा वीजपुरवठा सर्वात आधी सुरू करण्यात येईल व त्यानंतर दापोली शहर व टप्प्याटप्प्याने दापोली तालुक्यातील सर्व उपकेंद्रांमध्ये वीज पुरवठा सुरळीत करण्यात येईल अशी माहिती महावितरणच्या काळकाई कोंड कार्यालयाने तरुण भारतला दिली.
चिपळुणात महावितरणचे मोठे नुकसान
चिपळूण तालुक्याला वादळाचा सर्वाधिक फटका हा महावितरणला बसला आहे. तालूक्यात तब्बल 132 विज खांब कोसळल्याने शहरासह बहुतांशी तालूका रविवारी अंधारात होता. महावितरण कंपणीने ठेकेदारांच्या मदतीने तात्काळ वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी प्रयत्न सुरू केले. सोमवारी सायंकाळपर्यत 70 टक्के वीजपुरवठा सुरळीत करण्यात त्याना यश आले. मात्र अजूनही 30 टक्के तालूका अजूनही अंधारात राहीला आहे. दरम्यान वीज पुरवठा बंद झाल्याने त्याचा परिणाम पाणीपुरवठयावर अधिक झाला.
दोन दिवसानंतर राजापूरातील विद्युत पुरवठा सुरळीत
तोत्के चक्रीवादळामुळे ओणी येथील सबस्टेशनमध्ये निर्माण झालेल्या तांत्रिक बिघाडामुळे शनिवारपासून राजापूर शहरासह तालुक्यात बहुसंख्य भागातील वीजपुरवठा खंडीत झाला. सोमवारी सांयकाळी 4 वाजता वीजपुरवठा पूर्ववत करण्यात आला.
शनिवारी मध्यरात्री ओणी येथील 33 केव्ही सबस्टेशनमध्ये निर्माण झालेल्या तांत्रिक बिघाडामुळे तालुक्याचा बहुतांश परिसर अंधारमय झाला होता. वीजपुरवठा पुर्ववत करण्यात विद्युत वितरण विभागाला 2 दिवस यश आले नव्हते.
रविवारी झालेल्या वादळानंतर विविध ठिकाणी वीजेचे खांब कोसळुन तर काही भागात विद्युत वाहिन्यांवर झाडे पडून विद्युत पुरवठा खंडीत झाला होता. प्रदीर्घकाळ वीज गायब असल्याचा फटका शासकीय कार्यालयांना बसल्याने कामे खोळंबली होती. सोमवारी दुपारपर्यंत ओणी सबस्टेशनमधील तांत्रिक बिघाड दुरुस्त करण्यात यश आले असून सोमवारी सांयकाळी चारपासून वीजपुरवठा पुर्ववत झाला आहे.









