कोरोनासंबंधी सूचनांचे आदानप्रदान, राजनाथसिंगांकडूनही आढावा
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
कोरोनासंबंधीच्या सूचनांचे आदान प्रदान करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील मान्यवर डॉक्टरांशी संवाद साधला आहे. कोरोना नियंत्रणासाठी कार्यरत असणाऱया डॉक्टरांचे गट या चर्चेत सहभागी झाले होते. या डॉक्टरांकडे असलेली कोरोनासंबंधीची नवी माहिती पंतप्रधान मोदींनीही जाणून घेतली. तसेच त्यांच्याकडून मोलाच्या सूचनाही स्वीकारल्या, अशी माहिती देण्यात आली.
कोरोनाच्या दुसऱया उद्रेकाने देशभरात हाहाकार माजविला आहे. मागच्या उद्रेकापेक्षा नव्या उद्रेकाची तीव्रता जास्त आहे. तसेच मृत्यूचे प्रमाणही अधिक असल्याचे दिसून येत आहे. यासंबंधी प्रत्यक्ष उपचार करणाऱया डॉक्टरांचा अनुभव काय आहे, हे त्यांनी जाणून घेतले. डॉक्टरांच्या सरकारकडून असणाऱया अपेक्षा, सरकारच्या कामगिरीसंबंधी त्यांचे मत, तसेच भविष्यात घ्यावी लागणार असलेली दक्षत, आदी बऱयाच मुद्दय़ांवर चर्चा झाल्याचे सरकारी सूत्रांनी स्पष्ट केले.
लसीकरणावर भर हवा
लवकरात लवकर जास्तीत जास्त लोकांचे लसीकरण हा कोरोना नियंत्रणात आणण्याचा सर्वात महत्वाचा मार्ग आहे. सरकारने लसींची उपलब्धता करण्याच्या दिशेने पावले टाकावीत. तसेच आरोग्य विषयक नियमांचे पालन प्रत्येकाने करावे यासाठी प्रबोधन करावे, अशा सूचना यापूर्वीच तज्ञांनी दिल्या आहेत. सध्याच्या काळात अनेक राज्यांमध्ये लॉकडाऊन असल्याने नियमांचे पालन बहुतेकांकडून अनिवार्यपणे होत आहे. मात्र, याहीपेक्षा अधिका दक्षता घेणे आवश्यक आहे. तसेच लॉकडाऊन उठविल्यानंतरही नियमपालनात कुचराई होता कामा नये. येथून पुढे किमान एक वर्षभर हे सर्व करावे लागेल, असेही प्रतिपादन तज्ञांनी केले आहे. आपल्या हाती असणारे उपाय करण्यात कोणतीही हयगय केली जाऊ नये. ते अतिशय महागात पडू शकते, असेही निक्षून सांगण्यात आले अह
राजनाथसिंगांकडून आढावा
संरक्षणमंत्री राजनाथसिंग यांनी सोमवारी कोरोनाच्या संदर्भात सेनादलांच्या तयारीचा आढावा घेतला. कोरोनाविरुद्धच्या संग्रामात तिन्ही सेनादले महत्वाची भूमिका घेत आहेत. सिंग यांनी सेनाधिकाऱयांची संवाद साधून त्यांच्या सज्जतेची माहिती घेतली. तसेच संरक्षण विभागाशी जोडले गेलेले सार्वजनिक उद्योग आणि संरक्षण संशोधन आणि विकास संस्था (डीआरडीओ) यांच्या कार्याची पाहणीही त्यांनी केली. सज्जतेसंबंधी त्यांनी समाधान व्यक्त केले.
ऑक्सिजनची आयात
अन्य देशांकडून भारत द्रवरूप ऑक्सिजनची आयात करीत आहे. हा वायू भारतापर्यंत आणण्याचे महत्वाचे कार्य भारतीय नौदल करीत आहे. यासाठी नौदलाच्या 9 नौका सज्ज करण्यात आल्या आहेत. यासंबंधीची माहिती राजनाथसिंग यांना व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून देण्यात आली. सिंग यांनी सोमवारी सेनादलांच्या अधिकाऱयांशी स्वतंत्र बैठकीत चर्चा केली.
कोणत्याही परिस्थितीसाठी सज्जता
भारतीय सेना दलांनी सध्याच्या आव्हानात्मक काळात कोणत्याही परिस्थितीशी दोन हात करण्याची सज्जता ठेवावी असा इशारा देण्यात आला आहे. कोरोनाच्या संकटाबरोबच अन्य नैसर्गिक आपत्तीही येऊ शकतात. तसे झाल्यास त्यांचेही निवारण करावे लागणार आहे. सेनेला याची पूर्णतः जाणीव असून ती पूर्णपण तयार आहे, असे सेनाधिकाऱयांनी स्पष्ट केले, अशी माहिती देण्यात आली.









