सेन्सेक्स निर्देशांकात 848 अंकांची तेजीः बँका, वित्तकंपन्यांच्या समभागांची खरेदी
वृत्तसंस्था/ मुंबई
जागतिक सकारात्मक संकेताच्या जोरावर आठवडय़ाच्या पहिल्या दिवशी भारतीय शेअर बाजाराने चांगली सुरुवात केली. सोमवारी सरतेशेवटी बाजारात चौफेर खरेदीच्या जोरावर सेन्सेक्सचा निर्देशांक 848 अंकांच्या वाढीसह तर निफ्टी निर्देशांक 245 अंकांच्या वाढीसह बंद झाल्याचे पाहायला मिळाले.
सोमवार दिवसअखेर बीएसई सेन्सेक्स निर्देशांक 848 अंकांच्या वाढीसह 49,580.73 अंकांवर तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी निर्देशांक 245 अंकांच्या वाढीसह 14,923.15 अंकांवर बंद झाला. सोमवारी सकाळी बीएसई सेन्सेक्सचा निर्देशांक 259 अंकाच्या वाढीसह आणि निफ्टी निर्देशांक 78 अंकाच्या वाढीसह खुला झाला होता. बँकिंग आणि फायनान्शीयल क्षेत्रातील समभागांमध्ये खरेदी दिसून आली. धातू आणि फार्मा कंपन्यांचा निर्देशांक काहीसा कमकुवत होता. सन फार्मा ऍडव्हान्स रिसर्चच्या समभागाने 8 टक्क्यांची उसळी घेतल्याचे दिसून आले. सॉफ्टवेअर फर्म क्वीक हिलचा समभाग तर 13 टक्के तेजीत होता. कंपनीने शनिवारी तिमाही नफ्याचा निकाल जाहीर केला होता. त्याचाच परिणाम सोमवारी समभागाचा भाव वाढताना दिसला.
अलीकडे अनेक कंपन्यांचे तिमाहीचे आर्थिक नफा-तोटय़ाचे निकाल घोषित झाले आहेत. पैकी 523 कंपन्यांचे समभाग घोषणेनंतर बाजारात सलग तेजी दर्शवत आहेत. 103 कंपन्यांचे समभाग मात्र घसरण नोंदवत असल्याचे दिसून आले. शेअर बाजारात एकावेळी सेन्सेक्स निर्देशांक 516 अंकांच्या वाढीसह 49,248 वर तर निफ्टी निर्देशांक 138 अंकाच्या तेजीसह 14,816 अंकांवर व्यवहार करत होता.
सरकारी बँकांच्या समभागामध्ये खरेदी दिसून आली. तर एफएमसीजी व आयटी समभागांचा बाजाराला आधार मिळतो आहे. सेन्सेक्समधील 30 पैकी 21 समभागांमध्ये तेजी होती. इंडसइंड बँक, एसबीआय, ओएनजीसी, एचडीएफसी, बजाज फिनसर्व्ह, आयसीआयसीआय बँक, इन्फोसिस, रिलायन्स व आयटीसीचे समभाग तेजीत होते. दुसरीकडे एल अँड टी, एअरटेल, सनफार्मा, टायटन, डॉ. रेड्डीज व एशियन पेंट्स यांचे समभाग घसरणीत होते.








