झूमच्या माध्यमातून धनश्री लेले यांचे व्याख्यान
प्रतिनिधी / बेळगाव
मंथन कल्चरल अँड सोशल वेल्फेअर सोसायटीतर्फे रविवारी संध्याकाळी झूमच्या माध्यमातून ’नामदेवांची अभंगवाणी’ या विषयावर धनश्री लेले यांचे व्याख्यान झाले. नामदेवांच्या अनेक रचनांचा उल्लेख करत त्यांनी रसाळ असे विवेचन केले. त्या म्हणाल्या, नामदेवांकडे सात पिढय़ांकडून विठ्ठल भक्ती आली आहे. त्यांनी विठ्ठलाचा धावा अनेक तऱहेने केला आहे आणि त्यांच्या गाथांमध्ये प्रत्येक वळणावर वेगवेगळय़ा रुपात आणि वेगवेगळय़ा कृतीद्वारे विठ्ठल भेटत राहतो. किंबहुना नामदेव गाथेचा नायक हा विठ्ठलच आहे. त्यांच्या विठ्ठल भक्तीमुळे आई आणि पत्नी यांनी रखुमाईकडे ’विठ्ठलाला काही सांगा हो,’ अशी तक्रारही केली. परंतु नामदेवांची विठ्ठल भक्ती काही कमी झाली नाही. ज्ञानदेव हेसुद्धा विठ्ठल भक्तच, परंतु नामदेवांना भेटण्यासाठी खुद्द ज्ञानदेव त्यांच्यापाशी आले आहेत आणि त्या दोघांनी मिळून तीर्थाटन केले आहे. तत्पूर्वी नामदेवांचा हात खुद्द विठ्ठलाने ज्ञानदेवांच्या हाती दिला आहे, हे संक्रमण आहे. ज्ञानाला भक्तीची जोड आवश्यक आहे, हा त्यातील मुख्य गर्भितार्थ आहे, असे त्या म्हणाल्या.
नामदेवांनी या गाथा ग्रंथीत करून ठेवल्या. हा ठेवा केवळ अध्यात्माच्यादृष्टीने नव्हे तर तत्कालीन समाजव्यवस्था कशी होती हे आपल्या लक्षात येते. आज हताश आणि निराशाजनक वातावरणात त्यांच्या गाथांचे वाचन किंवा अध्ययन हे आनंदनिधान आहे, असेही धनश्री लेले यांनी स्पष्ट केले.
विचारांना खाद्य पुरवितात नामदेवांचे अभंग!
संत नामदेवांनी नामदेव गाथेच्या माध्यमातून देव आणि भक्त यांच्यातील अंतर कमी करून सर्वसामान्यांना आश्वस्त केले आहे. आजच्या निराशाजनक हतबल वातावरणामध्ये नामदेवांचे अभंग आपल्या विचारांना खाद्य देतात आणि सकारात्मकतेकडे वळवितात हे महत्त्वाचे, असे मत धनश्री लेले यांनी व्यक्त केले.









