प्रतिनिधी / बेंगळूर
राज्यात कोरोनाचा विस्फोट होत असून उपचाराचा उपयोग न झाल्याने अनेकांचा मृत्यू झाला आहे. या पार्श्वभूमीवर आपल्या मतदारसंघातील लोकांच्या मदतीसाठी धावून आलेले कृषीमंत्री बी. सी पाटील यांनी वैयक्तिकरित्या 50 हजार रुपयांची मदत जाहीर केली आहे. याद्वारे मंत्री पाटील यांनी संकटात सापडलेल्या लोकांसाठी मदतीचा हात पुढे केला आहे. कृषीमंत्री बी. सी. पाटील यांनी याबाबत एक व्हिडिओ प्रसिद्ध केला आहे. कोरोनाच्या दुसऱया लाटेत हिरेकेरूर विधानसभा मतदारसंघातील हिरेकेरूर आणि रट्टीहळ्ळी तालुक्मयातील अनेकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे त्यांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून कुटुंबीय संकटात सापडले आहेत. त्यामुळे मृतांच्या कुटुंबीयांना आपण वैयक्तिकरित्या प्रत्येकी 50 हजार रुपयांची मदत देण्याचा निर्णय घेतला आहे. सोमवारपासून आपण स्वतः प्रत्येक गावाला भेट देऊन सदर मदतनिधी देणार आहे, असे कृषीमंत्री पाटील यांनी सांगितले आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वांनी खबरदारी घ्यावी. ज्यांना कोरोनाची बाधा झाली आहे, अशांनी कोविड केअर सेंटरमध्ये दाखल होऊन उपचार करून घ्यावेत, असे आवाहनही पाटील यांनी केले आहे.









