झाडे पडून वाहतूक खोळंबली : वीज, फोन सेवा खंडित,अन्य भागातील संपर्क तुटला
प्रतिनिधी / काणकोण
तौक्ते चक्रीवादळाने काणकोण तालुक्यात हाहाकार माजला असून वादळी वाऱयासह पडलेल्या पावसाने पोळे ते गुळेपर्यंतच्या रस्त्यावर आणि तालुक्यातील अंतर्गत भागातील रस्त्यांवर मोठय़ा प्रमाणात झाडे उन्मळून पडल्यामुळे वीज खात्याचे मोठे नुकसान झाले. माशे परिसरातील खांडले, आगस, कारय, तामणे, पैंगीण परिसरांतील गिमणे, पर्तगाळी, खालवडे, शेळेर, गुळे, करमल घाट या भागात रस्त्यावर झाडे पडल्यामुळे वाहतुकीचा खोळंबा झाला आहे. वीज वाहिन्यांवर झाडे पडल्यामुळे काणकोण तालुक्यातील वीज पुरवठा शनिवारी रात्री 9.30 वा.पासून खंडित झाला तो रविवारी रात्री उशिरापर्यंत सुरळीत झाला नव्हता.
किनारी भागात या वादळाचा जबरदस्त तडाखा बसलेला असून पोळे, गालजीबाग, कोळंब, पाटणे, पाळोळे, आगोंद या भागातील कित्येक घरांमध्ये पाणी शिरले आहे. किनाऱयावरील हंगामी शॅक्स मोडली पडली आहेत. सावधगिरी बाळगून मच्छीमारी बांधवानी किनाऱयावर नांगरुन ठेवलेल्या मच्छीमारी बोटी वेळीच हलविल्या नसत्या तर गंभीर परिस्थिती उदभवली असतील. आकस्मात पाण्याची पातळी वाढल्यामुळे भरती रेषा पार करुन पाणी आत आल्याची माहिती माजी नगरसेवक दिवाकार पागी यांनी दिली. तर या धोक्यापासून सावधगिरी बाळगण्याचे आवाहन नगराध्यक्ष सायमन रिबेलो यांनी केले आहे.
मडगाव – कारवार मार्गावरील गुळे, करमल घाटात मोठय़ा प्रमाणात पडझड झाल्यामुळे या मार्गावरील वाहतूक सायंकाळी 5 वाजेपर्यंत सुरु झाली नव्हती. पोळे ते मडगाव या मार्गावर वाहतूक करणाऱया सर्व बसेस अडकून पडल्या होत्या. सतत पडणाऱया पावसामुळे काही ठिकाणी प्रवासी अडकून पडले आहे.
वर्तमानपत्रे काणकोणला पोहोचली नाहीत
कोणकोणपर्यंतची वाहतूक पूर्णपणे खोळंबल्यामुळे दरराज सकाळी 5.30 वा. काणकोणला पोहोचणारे वर्तमानपत्राचे गठ्ठे 12.30वा. कसे बसे पोहोचविण्यात संबंधितांना यश आले. मात्र माशे, पैंगीण, आगोंदा, गावडोंगरी भागात वर्तमानपत्रे पोचू न शकल्यामुळे वाचकांची खूपच गैरसोय झाली.
अग्निशामक दल व वीज खात्याची महत्त्वाची कामगिरी
रस्त्याच्या बाजूला वीज वाहिन्यांवर झाडे पडल्यामुळे काणकोण तालुक्यातील वीज सेवा पूर्णपणे बंद पडली आहे. तर वीज, फोन सेवा खंडित झाल्यामुळे या तालुक्याचा राज्याशी संपर्क तुटला आहे. मात्र काणकोण वीज खाते आणि अग्निशामक दलाच्या जवानांनी सतत पडणाऱया पावसाचा आणि वाऱयाचा धोका पत्करुन रस्त्यावरील झाडे बाजूला करुन रस्ता वाहतुकीला खुला करण्याचे काम केले आहे. या वादळात वीज खात्याचे मोठे नुकसान झाले आहे.









