सांचो, हालांडचे प्रत्येकी दोन गोल
वृत्तसंस्था/ बर्लिन
जेडॉन सांचो व अर्लिंग ब्रॉट हालांड या दोघांनीही नोंदवलेल्या प्रत्येकी दोन गोलांच्या बळावर बोरुसिया डॉर्टमंडने आरबी लीपझिगचा 4-1 अशा गोलफरकाने पराभव करून जर्मन कप स्पर्धेचे जेतेपद पटकावले.
लीपझिगचे कोच ज्युलियन नागेल्समन आपले पद सोडणार असून आपल्या संघाला जेतेपद मिळवून देत निरोप घेण्याची त्यांची इच्छा मात्र डॉर्टमंडने पूर्ण होऊ दिली नाही. डॉर्टमंडने प्रारंभापासूनच आक्रमक खेळावर भर दिला होता आणि पूर्वार्धात मिळालेल्या तीनही संधींचा पुरेपूर लाभ घेत भक्कम आघाडी घेतली. यातील दोन गोल सांचोने नोंदवले तर हालांडने एक गोल केला. ‘मी दोन गोल करू शकलो आणि हालांडला गोल करण्यासाठी साहय़ करू शकलो, याचा मला खूप आनंद होतो,’ असे सांचो नंतर रेडिओशी बोलताना म्हणाला. त्याला हॅट्टिक नोंदवण्याची संधीही मिळाली होती. लीपझिगचा गोलरक्षक पीटर गुलाक्सीला चकवून तो पुढे गेला होता. पण त्याचा फटका दूरवरून गेल्याने त्याची ही सुवर्णसंधी वाया गेली.
लीपझिगसाठी स्पेनचा मिडफिल्डर दानी ओल्मोने एकमेव गोल नोंदवला. सामना संपण्याच्या सुमारास हालांडने घसरल्यानंतरही चेंडूला गोलपोस्टची अचूक दिशा दाखवत संघाचा चौथा गोल केला. बोरुसिया डॉर्टमंडने क्लबच्या इतिहासात पाचव्यांदा हा चषक पटकावला आहे. नागेल्समन यांचे मात्र वरिष्ठ स्तरावर प्रशिक्षण देताना पहिले जेतेपद पटकावण्याचे स्वप्न भंगले. गेली दोन वर्षे ते लीपझिगचे प्रशिक्षकपद सांभाळत होते. 2019 मध्येही त्यांच्या संघाला अंतिम फेरीत बायर्न म्युनिचकडून पराभव पत्करावा लागल्याने उपविजेतेपदावरच समाधान मानावे लागले होते. पुढील मोसमात ते बायर्न म्युनिच संघाचे प्रशिक्षकपद सांभाळणार आहेत.
येथील सामन्यात पाचव्या मिनिटाला सांचोने डॉर्टमंडला आघाडी मिळवून दिली. त्यानंतर 28 व्या मिनिटाला हालांडने ही आघाडी 2-0 अशी केली. मध्यंतराच्या सुमारास सांचोने वैयक्तिक दुसरा व संघाचा तिसरा गोल नोंदवला. उत्तरार्धात लीपझिगने सुधारित प्रदर्शन केले आणि काही संधीही निर्माण केल्या. पण त्याचा त्यांना लाभ घेता आला नाही. 71 व्या मिनिटाला ओल्मोने त्यांना एकमेव यश मिळवून दिले. पण अखेरच्या क्षणांत हालांडने वैयक्तिक दुसरा व संघाचा चौथा गोल नोंदवून डॉर्टमंडचे जेतेपद निश्चित केले.









