ऑनलाईन टीम / मुंबई :
दक्षिण पूर्व अरबी समुद्रातील कमी दाबाच्या क्षेत्राचे रुपांतर चक्रीवादळात झाले असून, ‘तौत्के’ चक्रीवादळ महाराष्ट्राच्या किनाऱ्याजवळून गुजरातच्या कच्छच्या दिशेने पुढे सरकत आहे. येत्या काही तासात ते कोकण किनारपट्टीवर धडकणार आहे.
राज्यातील दक्षिण कोकण, दक्षिण महाराष्ट्र, विदर्भ, उत्तर किनारा या भागात 15 मे ते 17 मे या काळात मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे. दरम्यान, प्राथमिक अंदाजानुसार चक्रीवादळाचा संभाव्य मार्ग ओमानच्या दिशेने होता. त्यामुळे महाराष्ट्र किंवा गुजरातला त्याचा फटका बसणार नसल्याचे दिसून येत होते. मात्र, सध्याच्या अंदाजानुसार चक्रीवादळ गुजरातच्या किनारपट्टीकडे सरकत आहे. त्यामुळे ते समुद्रात महाराष्ट्राच्या किनारपट्टीजवळ असेल. परिणामी किनारपट्टीच्या भागात ताशी 70 ते 80 किलोमीटर वेगाने वादळी वारे आणि अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे.
चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाच्या पथकांना सर्तक राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.









