भोपाळ/प्रतिनिधी
देशात कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेमध्ये अनेक पत्रकारांचा कोरोना संसर्गाने मृत्यू झाला आहे. दरम्यान, कोरोना साथीच्या दुसर्या लाटेच्या पार्श्वभूमीवर मध्य प्रदेश सरकारने एक महत्वाचा निर्णय घेत पत्रकारांना मोठा दिलासा दिला आहे. मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी शुक्रवारी राज्यातील माध्यम क्षेत्रात काम करणारी व्यक्ती आणि त्यांच्या कुटूंबियांच्या कोरोना उपचाराची संपूर्ण जबाबदारी घेतली आहे. मुख्यमंत्र्यांनी प्रिंट, इलेक्ट्रॉनिक आणि डिजिटल मीडिया पत्रकारांच्या संसर्गाच्या उपचाराचा खर्च राज्य सरकार उचलेल, अशी माहिती त्यांनी आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरील व्हिडिओ संदेशाद्वारे दिली आहे.
मुख्यमंत्री म्हणाले की मीडियाचे पत्रकार दिवसरात्र काम करत आहेत. पत्रकार विमा योजनेअंतर्गत प्राधान्य आणि प्राधान्य नसलेल्या पत्रकारांवर उपचार करण्याची सोय राज्यात आहे. आता जर पत्रकार किंवा त्याच्या कुटुंबातील एखाद्यास संसर्ग झाला तर त्याच्या उपचाराचा खर्च राज्य सरकार उचलेल.
तत्पूर्वी, मुख्यमंत्र्यांनी साथीच्या आजारामुळे अनाथ मुलांसाठी पेन्शन जाहीर केली होती, तसेच या मुलांचे शिक्षण खर्च करण्याची जबाबदारी स्वीकारून अनाथ कुटुंबांना दरमहा मोफत रेशन देण्याचे आश्वासनही दिले होते. ते म्हणाले होते की, ‘कोरोनामुळे बरीच कुटुंबे उध्वस्थ झाली. अशी अनेक कुटुंबे आहेत ज्यांचा म्हातारपणाचा आधार नाहीसा झाला आहे आणि अशी काही मुले आहेत ज्यांच्या डोक्यावरील वडिलांचे छत्र नाहीसे झाले आहे. ज्या मुलांचे वडील, पालक मृत्य पावले आहेत आणि कोणीही पैसे कमवत नाही, अशा कुटुंबांना दरमहा ५ हजार रुपये प्रति महिना पेन्शन देण्यात येईल. ‘असे जाहीर केलं आहे.