प्रतिनिधी / सातारा :
कोरोनाची बाधा इतरांना होवू नये, म्हणून दुसरा लॉकडाऊन केला आहे. या लॉकडाऊनमध्ये सातारा शहरातील सर्व दुकाने बंद आहेत. अत्यावश्यक सेवेवाल्यांचीच वाहने फिरतीवर आहेत. विनाकारण फिरणाऱ्यांची चुकारीची वाहने फिरतात. मात्र, अत्यावश्यक सेवेवाल्यांच्या दुचाकीतील हवा गेल्यास अथवा पंक्चर झाल्यास त्यांच्यासमोर यक्ष प्रश्नच राहतो. परंतु मोहिते काकांना फोन गेल्यास लगेच काका स्वतःची जुगाड केलेली एम-80 घेवून पोहचतात. अन् अत्यावश्यक सेवेतल्यांचे मोफत पंक्चर काढून काम फत्त्ये करुनच परत जातात.
कोरोनामुळे प्रत्येकाचे जीवनमान बदलले आहे. गतवर्षी लॉकडाऊनमध्ये मोहिते काका अत्यावश्यक सेवेवाल्याच्या सेवेसाठी तत्पर होते. त्यांनी काही नर्सेसच्या दुचाकी जेथे पंक्चर झाल्या, तेथे जाऊन त्यांच्या दुचाकींचे पंक्चर काढून मोफत सेवा दिली होती. यावर्षीही पुन्हा कोरोनाची दुसरी लाट आली आहे. त्या लाटेत प्रत्येक जण होरपळून निघत आहे. ज्यांचे हातावर पोट आहे. ते भरडले जात आहेत. कोरोनाशी दोन हात करण्यामध्ये प्रशासन तत्पर आहे. कोरोना रोखण्यासाठी पोलीस, वैद्यकीय कर्मचारी लढत आहेत. अत्यावश्यक सेवेवाल्यांचे वाहन जर पंक्चर झाले तर अवघडच परिस्थिती आहे. संपूर्ण सातारा फिरला तरीही कोणीच पंक्चर काढून देणारा अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना भेटणार नाही, अशी परिस्थिती आहे. परंतु अशा वेळेस मोहिते काकांना फोन जाताच ते लगेच तेथे पोहचात अन् मोफत पंक्चर काढून देतात.
मोहितेकाका नेमके आहेत तरी कोण?
सोशल मीडियावरही मोहितेकाकांचे कौतुक झाले आहे. मोहितेकाका म्हणजे रामचंद्र माधवराव मोहिते. ते 1980 पासून साताऱ्यात स्थायिक आहेत. ट्रक ड्रायव्हर, क्लिनर, सेंट्रिंग, बांधकाम अशी सर्व कामे त्यांनी केलेली आहेत. मूळचे कराड तालुक्यातील तळबीडचे. पण सध्या ते साताऱ्यात रहातात. ‘लॉकडाऊन’मूळे त्यांचा चेहरा आणि ‘जुगाड एम-80 गॅरेज’ साताकरांच्या नेहमीच लक्षात राहत आहे.
त्यांची लक्षवेधी एम-80
मोहिते काकांनी त्यांच्याकडे असलेल्या एमएटीला छानसे बनवले आहे. लॉकडाऊनमध्ये त्यांचे चालतेबोलते गॅरेज कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बंदोबस्ताला असलेल्या पोलिसांना भेटून त्यांच्या दुचाकींची हवा तपासतात. वाढत्या उन्हामुळे अनेकदा हवा कमी होत असते. कमी झाली असेल तर भरुन देतात. कोणाची चार चाकी पंक्चर झाली असेल तर विचारणा करतात. माहिती मिळाल्यास तेथे पोहचून पंक्चरही काढतात.
‘कोरोना’विरोधात प्रत्येकाचा सहभाग हवा..!
पोलीस, शासकीय डॉक्टर आणि नर्स आपला जीव धोक्यात घालून ‘कोरोना व्हायरस’ विरोधातील लढाईत आपला सहभाग नोंदवत आहेत. त्यामुळे ते जर अडचणीत असतील आणि त्यांना कोणती मदत लागत असेल तर त्यांना सहकार्य करणे आपले सर्वांचे काम आहे. त्यांच्या मदतीसाठी एक सातारकर म्हणून मी सदैव पुढे असणार आहे. माझ्याकडून जेवढे होईल तेवढी मदत मी करणार आहे. मी कोणाला आर्थिक मदत नाही करू शकत परंतू माझ्या व्यवसायातून मी कोणाला तरी मोफत सेवा देऊ शकतो, याचे मोठे समाधान आहे.
– रामचंद्र मोहिते, सातारा









