प्रतिनिधी / सातारा
सातारा जिल्ह्यातील पत्रकारांना व त्यांच्या कुटुंबियांना कोरोना काळात वैद्यकीय सेवा सुविधा उपलब्ध व्हाव्यात अशी मागणी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संजीवराजे यांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा यांच्याकडे करताच विनय गौडा यांनी पत्रकार व त्यांच्या कुटुंबियांना वैद्यकीय सेवा सुविधा देण्यात याव्यात असे पत्र जिल्हा शल्यचिकित्सक, तालुका वैद्यकीय अधिकारी यांना काढले आहे.
जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संजीवराजे यांनी मागणी केलेल्या पत्रात म्हटले आहे, संपूर्ण महाराष्ट्रात कोरोनाने थैमान घातले असताना सातारा जिल्हा त्याला अपवाद नाही. किंबहुना जिल्ह्यात बिकट परिस्थिती असून या परिस्थितीत शासन, प्रशासन, लोकप्रतिनिधी यांच्या एकजुटीतून या भीषण परिस्थितीवर मात करण्याचा यशस्वी प्रयत्न सुरु आहे. त्या प्रयत्नात लोकप्रतिनिधी प्रशासनाला स्थानिक वृत्तपप्ते व त्यांच्या प्रतिनिधीं मार्फत अगदी छोट्य़ा गावातील वाडीवस्तीवरील बाधित रुग्ण, त्यांची स्थिती, उपचार, लसीकरण वैगेरे सर्व बाबी समोर आणून देवून योग्य भूमिका घेतली जावी, रुग्ण व त्यांचे नातेवाईकांना दिलासा मिळावा यासाठी प्रसंगी स्वतःचा जीव धोक्यात घालून घटनास्थळी जावून महिती प्रसिद्ध करतात.
अशावेळी जिल्ह्यातील सर्व पत्रकार, वृत्तपत्र प्रतिनिधी, सर्व प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी व त्यांच्या कुटुंबियांना तालुक्यातील त्यांच्या सोईच्या गावात कोरोना विषयक वैद्यकीय उपचार शासकीय अथवा खाजगी रुग्णालयात तातडीने उपलब्ध होतील, याचे नियोजन करुन तसेच आदेश काढावेत, अशी विनंती करण्यात आली होती. त्या अनुषंगाने जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा यांनी पत्रकारांना व त्यांच्या कुटुंबियांना वैद्यकीय सेवा पुरवण्याचे विनंतीवजा पत्र पाठवले आहे.









