प्रतिनिधी/ महाबळेश्वर
लॉकडाउनच्या नियमांचे उल्लंघन करून मागील बाजुने आपला व्यवसाय करणाऱया एका कापड व्यावसायिकस पालिकेच्या विशेष पथकाने साठ हजाराचा दंड करून त्याचे दुकान सील करण्याची कारवाई केली असल्याची माहिती पालिकेच्या मुख्याधिकारी पल्लवी पाटील यांनी दिली. दरम्यान, बाजारपेठेतील सर्वच व्यापाऱयांनी शासनाच्या नियमांचे कोटकोरपणे पालन करून प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहनही मुख्याधिकारी पाटील यांनी केले आहे
कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी राज्य शासनाने लॉकडाउन जाहीर करून काही निर्बंध घातले आहे असे असतानाही काही व्यवसायिक नियम झुगारून चोरी छुपे आपला व्यवसाय करीत आहेत. बाजारपेठेतील एक कापड दुकान मागील बाजुने सुरू असुन तेथे काही ग्राहकही गेले असल्याची खबर पालिकेच्या मुख्याधिकाऱयांना मिळाली. त्यांनी मिळालेल्या माहितीची खात्री करण्यासाठी कर निरीक्षक भक्ती जाधव यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथक पाठविले. या पथकात राजेंद चोरगे, गणपत कदम यांचा समावेश होता. पथकातील काही सदस्य मागील बाजुने दुकानात गेले असता त्या ठिकाणी मिळालेल्या माहितीप्रमाणे पाच ते सहा ग्राहक उपस्थित होते. तसेच त्या दुकानात सेल्समन व दुकान मालकही उपस्थित होते. ही सर्व माहिती भक्ती जाधव यांनी मुख्याधिकाऱयांना दिली. त्यांनी नियमा प्रमाणे दुकानावर दंडात्मक कारवाई करण्याची सूचना केली. दरम्यान या ठिकाणी पालिकेचे मुख्य लिपीक आबाजी ढोबळे, स्वच्छता मुकादम मनोज चव्हाण हे देखिल तेथे पोहचले. मुख्याधिकाऱयांनी दिलेल्या आदेशानुसार दुकानात उपस्थित असलेल्या ग्राहकांची संख्या लक्षात घेवुन दुकानदारास साठ हजाराचा दंड केला. त्याचप्रमाणे दुकान पुढील व मागील बाजुने सील केले.
मंगळवारी येथील ऑर्चिड मॉलमधील तीन दुकानांना पालिकेच्या विशेष पथकाने सील ठोकले होते ही कारवाई ताजी असतानाच आज पुन्हा पालिकेच्या पथकाने बाजारपेठेत धडक कारवाई करून कापड दुकान सील केल्याने शहरात याबाबत चांगलीच खळबळ माजली आहे.








