वृत्तसंस्था/ रोम
महिला टेनिसमधील जागतिक अग्रमानांकित ऑस्ट्रेलियाच्या ऍश्ले बार्टीने इटालियन ओपन टेनिस स्पर्धेत महिला एकेरीची तिसरी फेरी गाठली. तिने कझाकस्तानच्या श्वेडोव्हावर मात केली.
गेल्याच आठवडय़ात बार्टीला माद्रिद ओपन टेनिस स्पर्धेच्या अंतिम फेरीत साबालेन्काकडून पराभवाचा धक्का बसला होता. येथील सामन्यात तिने यारोस्लावा श्वेडोव्हाचा 6-4, 6-1 असा सहज पराभव करीत आगेकूच केली. श्वेडोव्हाने तीनदा ग्रँडस्लॅम स्पर्धांत उपांत्यपूर्व फेरीपर्यंत मजल मारलेली आहे. शिवाय जुळय़ा मुलांना जन्म दिल्यानंतर तिने टेनिसमध्ये नुकतेच पुनरागमन केले आहे. या सामन्यावेळी तिने डाव्या मांडीला स्ट्रपिंग केले होते. बार्टीची पुढील लढत रशियाची कुडरमेटोव्हा किंवा फ्रान्सची कॅरोलिना गार्सिया यापैकी एकीशी होईल. माजी विजेत्या नवव्या मानांकित कॅरोलिना प्लिस्कोव्हानेही आगेकूच करताना लॅटव्हियाच्या ऍनास्तेशिया सेवास्तोव्हाचा 6-2, 6-3 असा पराभव केला. क्विटोव्हा किंवा व्होनारेव्हा यापैकी एकीशी तिची पुढील लढत होईल. पाचव्या मानांकित एलिना स्विटोलिनाने अमेरिकेच्या अमांदा ऍनिसिमोव्हाचा 2-6, 6-3, 6-4 असा पराभव करून शेवटच्या सोळामध्ये स्थान मिळविले.









