बेंगळूर/प्रतिनिधी
राज्यात एकीकडे कोरोनाचे संकट असताना दुसरीकडे भाजपच्या काही नेत्यांमधून मुख्यमंत्री येडियुरप्पा यांच्या नेतृत्वबदलाबाबत वारंवार चर्चा केली जात आहे. राज्यात लवकरच मुख्यमंत्री बदलतील असे वक्तव्य भाजप नेत्याने केले होते. दरम्यान, राज्याचे गृहमंत्री बसवराज बोम्माई यांनी देशाचे गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतल्यानंतर चर्चेला उधाण आले. परंतु बोम्माई यांनी यापार्श्वभूमीवर पत्रकारांशी बोलताना, दिल्लीच्या भेटीमागे कोणतेही राजकीय कारण नव्हते हे मी स्पष्ट करू इच्छितो. राज्यातील कोविडच्या मुद्दय़ावरील चर्चे व्यतिरिक्त दिल्ली भेटीमागील इतर हेतू नव्हता, असे ते म्हणाले.
गृहराज्यमंत्री बसवराज बोम्माई यांनी सोमवारी सांगितले की केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याशी झालेली भेट ही राज्यातील नेतृत्व बदलण्याबद्दल नसून राज्यातील कोविड -१९ संबंधित होती असे ते म्हणाले. बोम्माई यांच्या सोबत भाजप कॉंग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष आणि मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांचा मुलगा बी. वाय. विजयेंद्र दिल्लीला गेल्याची चर्चा आहे. यानंतर बोम्मई हे राज्याचे पुढचे मुख्यमंत्री असतील असा अंदाज बांधला जात आहे.
नेतृत्व बदलण्याची चर्च नाही
मंत्री बोम्माई म्हणाले की नेतृत्व बदलण्याची कल्पना चुकीची आहे. अशा वेळी जेव्हा कोविड विरुद्ध प्रत्येकजण एकत्रित लढा देत आहेत, तेव्हा असे विचार प्रत्यक्षात येऊ नयेत. अशा गोष्टी सत्यापासून दूर असतात. अमित शहा यांनी कर्नाटकमधील कोविड व्यवस्थापनाबद्दल समाधान व्यक्त केले, तसेच राज्यात संसर्ग होण्याचा वाढता धोका नियंत्रणात आणण्यासाठी वेगवान उपाययोजनांवर भर दिला जावा असे सांगण्यात आले.
बैठकीत त्यांनी राज्यात निर्माण होणाऱ्या ऑक्सिजनचा वापर अन्य राज्यांमधून आणण्याऐवजी राज्यात निर्मिती करण्याची परवानगी मागितली आणि ऑक्सिजन टँकरच्या अभावावर चर्चा केली. त्यास उत्तर देताना केंद्रीय गृहमंत्री म्हणाले की, केंद्र चार टँकरना मान्यता देईल. भविष्यात राज्यात आणखी १० टँकर देण्यात येतील परंतु यास काही कालावधी लागेल.