जिल्हाधिकारी, सीईओंनी केले कौतुक
प्रतिनिधी / ओरोस:
कोविड काळात प्रशासनाला अनेक पातळीवर काम करावे लागत आहे. एकीकडे जिल्हय़ातील शासकीय कोविड सेंटरमध्ये दाखल रुग्ण, ऑक्सिजन पुरवठा, आरटीपीसीआर टेस्ट अशा सर्वच बाबतीत प्रशासन अहोरात्र कार्यरत आहे. त्यात लसीकरणाचे काम सुरू झाल्याने त्याच्या नोंदीही ठेवाव्या लागत आहेत. अशावेळी काही सामाजिक संस्थाही प्रशासनाच्या मदतीला येत आहेत. सावंतवाडी येथील ‘वुई फॉर यू’ संस्थेने प्रशासनाच्या मदतीसाठी एक ऍप विकसित केले. सोमवारी सदर ऍप वापरासाठी जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी, जि. प. सीईओ प्रजीत नायर यांच्या उपस्थितीत प्रशासनाकडे देण्यात आले.
प्रशासनाला प्रत्येक रुग्णाची सविस्तर माहिती ही आयसीएमआर पोर्टलला अपलोड करावी लागते. या प्रोसेसला बराच कालावधी लागतो. मात्र, या सॉफ्टवेअरमुळे ही प्रक्रिया ऑटोमेटिक अपलोड होते. ज्या प्रक्रियेला 70 मानवी तास लागायचे, तीच प्रक्रिया आता सात मानवी तासांमध्ये होत आहे. त्यामुळे
प्रशासनाचा वेळ वाचत आहे. हे सॉफ्टवेअर 10 मे रोजी जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी, जिल्हा पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे, जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजीत नायर यांच्या उपस्थितीत जिल्हा प्रशासनाला सुपूर्द करण्यात आले.
‘वुई फॉर यू’ संस्था चांगले कार्य करत आहे. भविष्यातही असेच सहकार्य करत राहा, असे उद्गार जिल्हाधिकाऱयांनी काढले. तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी
प्रजीत नायर यांनीही संस्थेच्या उपक्रमाबद्दल आभार मानत यापुढेही प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन केले.
या सॉफ्टवेअरची निर्मिती वुई फॉर यू संस्थेचे आयटी इन्चार्ज देवेंद्र नागेश हळदणकर यांनी केली आहे. यावेळी संस्थेचे अध्यक्ष ऍड. संकेत नेवगी, सचिव ऍड. स्वप्निल कोलगावकर, सहसचिव अमेय महाजन, खजिनदार मिहिर मोंडकर, सदस्य दत्तप्रसाद नाटेकर, आय. टी. हेड देवेंद्र हळदणकर आदी उपस्थित होते.
वुई फॉर यू संस्था संस्था प्रशासन आणि नागरिक यांच्यासाठी उपयुक्त ठरेल अशा आणखी एका उपक्रमावरही काम करत आहे. त्यामुळे प्रशासनाला आणखी मदत होईल, असे संस्थेचे अध्यक्ष ऍड. नेवगी यांनी सांगितले.









