वृत्तसंस्था/ माद्रीद
एटीपी टूरवरील येथे सुरू असलेल्या माद्रीद मास्टर्स पुरूषांच्या टेनिस स्पर्धेत जर्मनीचा ऍलेक्सझांडेर व्हेरेव्ह आणि इटलीचा मॅटेव बेरेटेनी यांच्यात एकेरीच्या जेतेपदासाठी लढत होईल.
शनिवारी या स्पर्धेतील झालेल्या पुरूष एकेरीच्या उपांत्य सामन्यात जर्मनीच्या पाचव्या मानांकित व्हेरेव्हने ऑस्ट्रीयाच्या थिएमचा 6-3, 6-4 अशा सरळ सेट्समध्ये पराभव करत अंतिम फेरी गाठली आहे. या स्पर्धेत गेल्या शुक्रवारी व्हेरेव्हने स्पेनच्या नदालचा उपांत्यपूर्व फेरीत पराभव केला होता. नदालने यापूर्वी ही स्पर्धा पाचवेळा जिंकली होती. ऑस्ट्रीयाच्या तृतीय मानांकित थिएमचे या स्पर्धेतींल आव्हान संपुष्टात आले असून आता तो पुढील आठवडय़ात सुरू होणाऱया रोममधील स्पर्धेत भाग घेणार आहे. दुसऱया उपांत्य सामन्यात इटलीच्या मॅटेव बेरेटेनीने 22 वर्षीय रूडचा 6-4, 6-4 असा पराभव करत अंतिम फेरीत स्थान मिळविले. बेरेटेनीला नॉर्वेच्या रूडवर विजय मिळविण्यासाठी 80 मिनिटे झगडावे लागले.









