4 मंत्र्यांसह 26 खासदारांना कोरोनाची लागण – ओलींच्या अडचणी वाढल्या
वृत्तसंस्था/ काठमांडू
नेपाळमध्ये पंतप्रधान केपी ओली शर्मा यांच्या अडचणी कमी होण्याची चिन्हे नाहीत. सोमवारी होणाऱया बहुमत परीक्षणादरम्यान ओली सरकारसमोर कोरोनानेही अडचणी वाढविल्या आहेत. विशेष अधिवेशनापूर्वी सरकारच्या 4 मंत्र्यासह 26 खासदारांना कोरोनाची लागण झाली आहे.
बहुमत सिद्ध करण्यासाठी 10 मे म्हणजेच सोमवारचा दिवस निश्चित करण्यात आला आहे. विशेष अधिवेशनाच्या तयारीदरम्यान सर्व खासदारांची आरटी-पीसीआर चाचणी करविण्यात येत आहे. मोठय़ा संख्येत खासदार संक्रमित झाल्याने चिंता वाढली आहे. खासदार संक्रमित झाल्याची माहिती संसदेचे सचिव गोपाल नाथ योगी यांनी दिली आहे. या खासदारांच्या मतदानाच्या व्यवस्थेचा निर्णय सभापतींकडून घेतला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.
नेपाळचे पंतप्रधान केपी शर्मा ओली यांच्या सरकारला बहुमत सिद्ध करण्यास सांगण्यात आले आहे. या सरकारमध्ये सामील कम्युनिस्ट पार्टी ऑफ नेपाळ (माओवादी सेंटर)ने स्वतःचा पाठिंबा मागे घेतला आहे. नेपाळ संसदेच्या कनिष्ठ सभागृहात 271 सदस्य बहुमत परीक्षणात सामील होणार आहेत. सरकार वाचविण्यासाठी ओली यांना 136 खासदारांच्या पाठिंब्याची गरज भासणार आहे. नेपाळमध्ये कोरोना संकट हे भारताहून अधिक तीव्र असल्याचे मानले जात आहे.









